*खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांचा निर्णायक एल्गार; ताडोबाच्या दारातून एकाही जिप्सीला आत सोडणार नाही*
जाहिरात
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (TATR) स्थानिकांना होणाऱ्या आर्थिक अन्यायाविरोधात, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली , १ ऑक्टोबर २०२५ पासून तीव्र आंदोलन सुरू होणार आहे. स्थानिकांसाठी प्रवेश शुल्क कमी न केल्यास, नवीन पर्यटन हंगामाच्या पहिल्याच दिवशी ताडोबातील जिप्सी सफारी पूर्णपणे थांबवण्यात येईल, असा स्पष्ट आणि अंतिम इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांना दिला आहे.
वाघांच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या स्थानिकांवरच आर्थिक भुर्दंड
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या गंभीर असताना, त्याच जिल्ह्यातील नागरिकांकडून कोर झोनमध्ये शनिवार-रविवारसाठी तब्बल १२,६०० इतके अवाच्यासवा प्रवेश शुल्क आकारले जात आहे. या अन्यायामुळे स्थानिक नागरिकांसाठी ताडोबा दर्शन हे केवळ 'स्वप्न' बनले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, "जे नागरिक वाघांच्या हल्ल्यांमुळे जीव गमावत आहेत, त्यांनाच वाघाचे दर्शन घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. ताडोबामुळे जिल्ह्याची ओळख आहे, पण आज ताडोबा येथील लोकांनाच परका झाला आहे. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही."
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ठामपणे सांगितले आहे की, हा इशारा केवळ एक मागणी नसून, चंद्रपूरच्या नागरिकांच्या हक्कांसाठी उभारलेले मोठे आणि निर्णायक आंदोलन असेल. शासनाने तातडीने दखल घेऊन स्थानिकांना न्याय द्यावा, अशी तीव्र अपेक्षा आहे.
*******
Comments
Post a Comment