चंद्रपूर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा – मुकेश जिवतोडे यांची कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्याकडे मागणी

चंद्रपूर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा – मुकेश जिवतोडे यांची कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्याकडे मागणी

वरोरा : अलीकडील अतिवृष्टी आणि "येलो मोजॅक" या रोगराईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. विशेषतः वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये, यासाठी लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी कृषी राज्यमंत्री मा. ॲड. आशिष जयस्वाल यांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, सोयाबीन पिकावर "येलो मोजॅक" या रोगाचा गंभीर प्रादुर्भाव झाला आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात घेण्यात येणारे कापूस पीकही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला असून त्यांच्या उदरनिर्वाहावर मोठे संकट आले आहे. कर्जबाजारीपणात अडकलेले शेतकरी जीवन मरणाच्या टोकावर उभे असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त यादीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात प्रचंड नुकसान होऊनही या जिल्ह्याला वगळणे हा गंभीर अन्याय असल्याचे जिवतोडे यांनी स्पष्ट केले.त्यामुळे, चंद्रपूर जिल्ह्याचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत दिली जावी, अशी ठाम मागणी त्यांनी कृषी राज्यमंत्रींकडे केली. शेतकऱ्यांच्या हाकेला शासनाने संवेदनशील प्रतिसाद देऊन दिलासादायक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही मुकेश जिवतोडे यांनी व्यक्त केली.

*************

Comments