वरोरा
डॉ. मनोज तेलग
मोरवा (वि.) — गावातील पाच वर्षीय चिमुकला प्रितम अनिल उमाटे याला ब्लडकॅन्सर (रक्तकर्करोग) असून त्यासाठी दरमहा नागपूरला केमोथेरपीसाठी जावे लागते. कोरोना काळात वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. ही वस्तुस्थिती समजताच जिल्हा परिषदेच्या मोरवा शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून मदत करण्याचा प्रयत्न केला. हे वृत्त समजल्यावर साहित्यिक कवी अशोक वर्मा, उपविभागीय अभियंता एल. व्ही. घागी, प्रभाकर मस्के, विश्वदीप गोंडाने, अर्जुन चव्हाण यांसारख्या दानवीरांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. मनोज तेलंग यांच्याशी संपर्क साधून मदतीसाठी हात पुढे केला.
गावातील सरपंच स्नेहा साव, उपसरपंच भूषण पिदूरकर, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत प्रितमला आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यात श्रुती थेरे, आयुष वैरागडे, अदिती पिंपळकर, वैदेही सालोडकर यांचा समावेश होता. परिसरातील प्रयोगशील शेतकरी रामभाऊ बुचे (येरूर) यांना कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शालेय साहित्यासाठी विद्यार्थ्यांचा मदतीला हातभार लावणारे गौरव पाटील यांना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ कवी अशोक वर्मा यांना डॉ. पंजाबराव देशमुख जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रितमला कायम मदतीचा हात देण्यासाठी तपोवन लेव्हिस्टिक प्रा. लि. (चंद्रपूर) या कंपनीच्या सामाजिक दायित्व फंडातून ३० टक्के रक्कम प्रितम सारख्या गरजूंना देण्यात येईल, असे डॉ. मनोज तेलंग यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी प्रितमला मदत देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची दखल म्हणून पैगाम सामाजिक संस्थेच्या वतीने राहील पटेल, अशोक धात्रक, गौरव पाटील यांनी स्कूल बॅग व नोटबुक देऊन विद्यार्थ्यांचा आभार मानला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन चव्हाण (शिक्षक) यांनी केले, तर प्रास्ताविक त्रिग्य गोंडाने यांनी केले. आभार प्रदर्शन अक्षय काटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन साव, रजनी पिदूरकर, शुभांगी थेरे, प्रिती मुसळे, संतोष गेडेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment