विकसित भारतासाठी तयार होणार आदिवासी गावांचा आराखडा**Ø आदि कर्मयोगी प्रशिक्षण कार्यशाळेचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन*
*Ø आदि कर्मयोगी प्रशिक्षण कार्यशाळेचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन*
चंद्रपूर, दि. 8 : प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत सेवा व लोककेंद्रीत विकासाची पुर्तता करण्यासाठी केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू केले आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आदिवासी गावांचा आराखडा तयार होणार आहे. जेणेकरून सन 2047 च्या विकसीत भारताच्या संकल्पनेत त्याचा समावेश करता येईल. त्यामुळे लोकसहभागातून आपल्या जिल्ह्याचे उत्कृष्ट ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करा, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने वन अकादमी येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर तसेच इतर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
‘आदि कर्मयोगी अभियान’ हे केंद्र शासनाचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, या माध्यमातून आदिवासी समाजाकरीता असलेल्या 1. पीएम जनमन योजना, 2. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, 3. राष्ट्रीय सिकलसेल उच्चाटन मोहीम आणि 4. एकलव्य निवासी शाळांचा विस्तार आणि शिष्यवृत्ती योजना तसेच आदिवासी बांधवांसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर योजनांवर आधारीत लोकसहभागातून उत्कृष्ट गावनिहाय आराखडा तयार करावयाचा आहे. त्यासाठी राज्यस्तर, जिल्हा, तालुकास्तर मास्टर ट्रेनर तयार करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आपापल्या गावस्तरावर योग्य प्रशिक्षण द्यावे. या तीन दिवसाच्या प्रशिक्षणाचा चांगला फायदा करून संपूर्ण प्रक्रिया समजावून घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रशिक्षणार्थ्यांना केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले, ‘आदि कर्मयोगी’ हे अभियान सेवा, समर्पण आणि संकल्प यावर आधारीत आहे. आदिवासी बांधवांसाठी चार मुख्य योजनांवर मास्टर ट्रेनरची ही जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रशिक्षण हे आपले कौशल्य विकसीत करण्यासाठी असते, त्यामुळे त्याचा योग्य लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावे तर पीएम जनमन योजनेत 68 गावांचा समावेश आहे. आदिवासी गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, पोषण, रोजगार, पाण्याची उपलब्धता करणे आाणि शासनाशी संपर्क ठेवण्यासाठी ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावांचे नियोजनबध्द आराखडे तयार करावयाचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
सदर कार्यशाळेकरीता 9 जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनरसह एकूण 120 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, वनविभाग, महावितरण, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग आणि जि.प. पंचायत विभागाचा समावेश होता.
*असे आहे ‘आदि कर्मयोगी अभियान’:* आदिवासी भागात तळागाळातील शासन व सेवा वितरणामध्ये आमुलाग्र परिवर्तन घडविणे, आदिवासी समुदायांना सशक्त करण्यासाठी प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमांतर्गत नेत्यांचे कॅडर निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सेवा, समर्पण आणि संकल्प या तत्वावर हे अभियान राबविले जाणार असून आदिवासी भागांमध्ये शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहचवली जाईल. आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण भारतात 20 लक्ष परिवर्तनशील नेत्यांचे मिशन आधारीत कॅडर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
००००००
Comments
Post a Comment