वरोरा तालुक्यात अव्यवस्थेमुळे नवजात बाळाचा मृत्यू; गर्भवती महिलेला वेळेत वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे आक्रोश,माझ्या बाळाच्या मृत्यूला लोकप्रतिनिधी आणि प्रशासनच जबाबदार.. पूजा तुराळे

वरोरा तालुक्यात अव्यवस्थेमुळे नवजात बाळाचा मृत्यू; गर्भवती महिलेला वेळेत वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे आक्रोश

माझ्या बाळाच्या मृत्यूला लोकप्रतिनिधी आणि प्रशासनच जबाबदार.. पूजा तुराळे

विशेष बातमी 
डॉ. मनोज तेलंग (सामाजिक कार्यकर्ते), नागरी 
---------------------------------------
जाहिरात
****************************
वरोरा : मुसळधार पाऊस आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वरोरा तालुक्यातील बोडखा गावात एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने गावात रोषाची लाट पसरली आहे. बोडखा ते कोसरसार पुलावरून शाळेच्या मुलांसह इतर नागरिकांना कंबरभर पाण्यातून ये-जा करावी लागते, अशी ही दयनीय स्थिती असून, समाजमाध्यमांतून वारंवार याबाबत माहिती दिली गेली असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही.

सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे गावातील पुजा सतीश तुराळे (२७) या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला तातडीने कोसरसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा कुटुंबीयांनी प्रयत्न केला. परंतु, गावातून आरोग्य केंद्रापर्यंतचा मार्ग पुराच्या पाण्यामुळे अडथळा निर्माण झाल्यामुळे बंद होता. अखेरीस, आशासेविकेच्या मदतीने गावातच प्रसूती करण्यात आली, परंतु वैद्यकीय सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांच्या अभावात नवजात बाळाचा काही क्षणातच मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. गावातील लोकांनी म्हटले आहे की, रस्त्याची दुरुस्ती आणि पुलाची उंची वाढवण्यासाठी वारंवार निवेदने दिली गेलीत, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. "वेळीच उपाययोजना केली असती तर आज माझं बाळ माझ्या नजरेसमोर असतं," असे पुजा तुराळे यांना वेदनेने सांगितले.

गावातील नागरिकांनी आता ठराविक निर्णय घेतला आहे की, रस्ता दुरुस्त होईपर्यंत आणि पुलाची उंची वाढवण्यात येईपर्यंत कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नाहीत आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत. गावात अजूनही अनेक गर्भवती महिला आहेत आणि त्यांच्यासोबत असाच प्रसंग घडू नये, यासाठी स्थानिक नागरिक एकत्रितपणे लढा देणार आहेत.
**********************

जाहिरात
कल्पतरू मंडळाला आमदार करण देवतळे यांची सदिच्छा भेट.
कल्पतरू गणेश मंडळा तर्फे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार.
**************************




Comments