भारतीय उत्सव परंपरा आणि आधुनिकता : वैज्ञानिक विश्लेषण

भारतीय उत्सव परंपरा आणि आधुनिकता : वैज्ञानिक विश्लेषण

डॉ प्रवीण मुधोळकर 

भारतातील  निसर्ग संपन्नता आणि उत्सवप्रियता यांचा फार निकटचा संबंध आहे असे लक्षात येते. भारतातील उत्सवांची निसर्गाशी अत्यंत संवेदनशीलतेने नाळ बांधल्या गेली आहे असे सूक्ष्म अध्ययन केल्यास जाणवते. हजारो वर्षाची ज्ञान परंपरा, ऋषीमुनींचे योगदान आणि निसर्ग संपन्नता या सर्वाचा संयोग भारतीय संस्कृतीमध्ये दिसून येतो. निसर्गाचे ऋतुचक्र आणि त्यातील होणारे बदल याचा संबंध भारतीय जीवन पद्धतीशी जोडल्या गेलेला आहे हे  भारतीय उत्सव परंपरेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या उत्सव परंपरेला विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा सखोल असा आधार असल्याचे जाणवते.  भारतीय परंपरा आणि उत्सवांचा मतितार्थ  तसेच भारतीय जीवन पद्धती आणि विज्ञान यांचा सहसंबंध जाणून घ्यायचा असेल तर  आपणास  पृथ्वीवरील जीवसृष्टी आणि तेथील जिवांचा परिवेश याबाबतचे वैज्ञानिक विश्लेषण लक्षात घ्यावे लागते. कोणतेही विज्ञान विशेषत: भौतिक आणि जीव विज्ञान हे पृथ्वीवरील परिवेशाच्या आणि तेथील जीवसृष्टीच्या संरक्षणाचे समर्थन करते. कारण मानवी अस्तित्व हे परिवेशातील इतर जीवांच्या अस्तित्वावर आधारलेले आहे हे मूलभूत सत्य आहे. त्यामुळे या परिवेशातील प्रत्येक जीवाचे वैशिष्ट्य आणि अस्तित्व जपून ठेवणे हे मानव जातीचे आद्य कर्तव्य आहे. भारतीय संस्कृतीतील सण आणि उत्सव लक्षात घेता आपणास असे लक्षात येईल की विज्ञानाला अभिप्रेत असलेले जीवसृष्टीचे अस्तित्व हे या उत्सवांच्या माध्यमातून अत्यंत भावनात्मक पद्धतीने जोपासल्या गेले आहे. भारतीय उत्सवांची सुरुवात ही आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा या सणापासून सुरू होते तर ती दिवाळीपर्यंत निरंतर सुरू असते. या संपूर्ण काळात विविध सणांची  रेलचेल सुरू असते. या प्रत्येक सणाचे आपापले वैशिष्ट्य आणि निसर्गातील  बदलांचा समावेश असल्याचे लक्षात येते. या उत्सव परंपरेमध्ये  निसर्गातील परिवर्तनाचा समावेश तर आहेच परंतु समाजातील विविध घटकांमध्ये असलेली सामाजिक संबंधांची वीण सुद्धा लक्षात घेतलेली आहे. त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक घटकांना महत्त्व देत समाज एक संघ कसा राहील आणि त्यातून एकमेकांच्या गरजा कशा पुरविल्या जातील याचा सुद्धा फार सूक्ष्मतेने अभ्यास केला गेला आहे असे लक्षात येते. वर्षा ऋतु अर्थात पाऊस पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वात प्रथम नागपंचमी आणि त्यानंतर पोळ्याचा उत्सव येतो. या उत्सवामध्ये शेतकऱ्याला आणि त्याच्या कृषी व्यवस्थेला फार मोठे महत्त्व असते.  समाजाला अन्नधान्य पुरवून समाजाचे पोषण करणाऱ्या शेतकऱ्याप्रती कृतज्ञता बाळगण्यासाठी सर्वात प्रथम नागपंचमी आणि पोळा हे सण काही दिवसांच्या फरकाने साजरे केले जातात. नागपंचमी साजरी करण्याच्या परंपरेवर अनेकदा टीका केली जाते त्यामध्ये असे म्हटले जाते की घरी साप आल्यास त्याला मारले जाते परंतु नागपंचमीच्या दिवशी त्याला पूजा केली जाते ही पद्धत गोंधळ निर्माण करणारी आहे. एका दृष्टीने या विचारांमध्ये सत्यता आहेच.परंतु केवळ भारतीय नव्हे तर इतर संस्कृतीमध्ये सुद्धा नागपूजनाची परंपरा राहिलेली आहे असे लक्षात येते. जगात अनेक ठिकाणी नागपूजनाच्या वेगवेगळ्या पद्धती असल्याचे लक्षात येते. सरपटणारे  प्राणी यामध्ये गांडूळ साप किंवा तत्सम अनेक प्राण्यांचा समावेश होतो या प्राण्यांचा मानवी जीवनाला पोषण देणाऱ्या अन्न निर्मितीच्या साखळीमध्ये फार मोठे महत्त्वाचे योगदान असते.

 त्यामुळे जमिनीखाली राहणाऱ्या या सर्व प्राण्यांचे अस्तित्व  हे मानवी अस्तित्वाला टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे हे महत्वपूर्ण सत्य आहे. जैव वैज्ञानिक दृष्ट्या जीवसृष्टी निकोप पद्धतीने कायम ठेवायची असेल तर या सर्वच्या सर्व जीवांना कायम ठेवावे लागेल तेव्हाच मानवी जीवन जास्त निरोगी आणि सुंदर होईल. या दृष्टीने पाहता नाग पंचमी या उत्सवाचा या सर्व जमिनीखालील प्राण्यांचा प्रति कृतज्ञता आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण करणे हाच उद्देश असावा. या सणाला अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धाचे संदर्भ असले  तरी त्यातील वैज्ञानिक गाभा लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. जर आपण सापांना नष्ट केले तर या पृथ्वीचे, येथील जीवसृष्टीचे तसेच कृषी व्यवस्थेचे काय होईल याचा विचार करणे भाग पडते. भारतीय कृषी व्यवस्था आज आधुनिकतेकडे पावले टाकत आहे.तरीपण ग्रामीण भागात अजूनही बैल या कृषी व्यवस्थेसाठी उपयुक्त असलेल्या प्राण्याचे महत्त्व कमी झालेले नाही. कृषीव्यवस्थेमध्ये त्याचे अस्तित्व केवळ श्रमिक प्राणी म्हणून नव्हे तर भावनिक दृष्ट्या शेतकऱ्यांशी त्याचे अनामिक असे नाते जुळले आहे. कृषी व्यवस्थेतील त्याचे योगदान पाहता त्याच्याप्रती कृतज्ञता प्रदर्शित करण्यासाठी पोळा या सणाचा आयोजन केले जाते. भारतीय शेतीची सेंद्रिय व्यवस्था कायम ठेवण्यासाठी गोवंशाचे फार मोठे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे शेतीतील श्रम आणि शेतीच्या मातीचा कस कायम ठेवण्यासाठी या प्राण्याचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे. त्यामुळेच या प्राण्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी पोळा या सणाचे आयोजन केले जाते . परंतु अलीकडच्या काळात शेतीचे झालेले यांत्रिकीकरण आणि ट्रॅक्टर सारख्या मोठ्या यंत्राचा उपयोग यामुळे बैलांचे प्रमाण आणि महत्त्व झपाट्याने कमी होत आहे  आणि त्यामुळेच जमिनीचा पोत नष्ट होऊन त्यातून निर्माण झालेल्या अन्नधान्याद्वारे कर्करोग किंवा इतर रोगाची लागण होताना दिसते आहे. पंजाब या राज्यातील शेत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खते आणि कीटकनाशक यांचा वापर केल्यामुळे तेथील जमिनी पूर्णपणे नापिक झाल्या असून तेथील उत्पन्नामुळे लोकांना कर्करोग होत आहे.त्यामुळे या लोकांना महागड्या दवाखान्यातून उपचार घ्यावा लागला आहे. यावरून बैलांसारख्या उपयुक्त घटकाचे महत्त्व अधोरेखित होते कदाचित ही बाब आपल्या पूर्वजांना लक्षात आली असावी म्हणूनच त्यांनी हा एक दिवस त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जपून ठेवला असावा. भारतीय समाज व्यवस्था ही परस्परावलंबित अशा स्वरूपाची होती. विशेषत: ग्रामीण भागात बलुतेदारी व्यवस्था ही या परस्परावलंबनाचे प्रतिनिधित्व करीत होती. त्यामध्ये 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार अशा कृषी व्यवस्थेशी संबंधित घटकांचा समावेश होता त्यामध्ये कुंभार हा सुद्धा महत्त्वाचा घटक होता. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली त्यामुळे या कुंभार वर्गाला एक व्यवसाय मिळाला गणेश मूर्तींची निर्मिती आणि त्यातून मिळणारा आर्थिक लाभ आणि व्यवसाय हे त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे चरितार्थाचे साधन ठरले. गणपती उत्सवामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यात कोट्यावधी रुपयांची उलाढाल बाजारपेठेत होत असते. अगदी हारतुरे,दूर्वा यापासून तर सजावटीच्या वस्तू, विद्युत साधने आणि वाहतूक व्यवस्था अशा सर्वांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो. गणेशोत्सव संपल्यानंतर काही दिवसात नवरात्र उत्सव सुरू होतो स्त्रीशक्ती जागरण हा या उत्सवाचा प्रमुख उद्देश असून अलीकडच्या काळात याला स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्याधिक महत्त्व दिले जात आहे. भारतात अलीकडे स्त्री पुरुष समानतेच्या विचारांना मिळणारे समर्थन पाहता नवरात्र उत्सवाचे महत्व जास्त अधोरेखित होते. गुजरात मध्ये लोकप्रिय असलेले गरबा ही नृत्य परंपरा अलीकडे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेली आहे. या गरबा नृत्य प्रकाराला अलीकडे आधुनिकतेची जोड मिळत आहे. मोठ्या प्रमाणात होणारी लोकांची गर्दी त्यामुळे विविध व्यावसायिक मंडळी याचा फायदा उचलताना दिसत आहे. यामुळे उत्सवाची धार्मिकता कमी होऊन या उत्सवाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होत असताना दिसून येते. विद्युत झगमगाट आणि डीजेचा गोंगाट यामध्ये उत्सवाचे पावित्र्य कुठेतरी हरविले जात असल्याची वेदना मनाला जाणवते. कधीकाळी हे उत्सव समाज प्रबोधनाचे मनोरंजनाचे आणि  सात्विक आनंद देणारे म्हणून ओळखले जात होते.परंतु कालमानानुसार याचे स्वरूप बदललेले आहे . यापासून मिळणाऱ्या आनंदावर आता आधुनिकतेचे जाळे पसरत असून त्यामुळे यापासून मिळणारा आनंद हा  लोप पावत असल्याचे जाणवते. मुळात या सर्व सण उत्सवांचा उद्देश हा सामाजिक सद्भाव निर्माण करून सामाजिक ऐक्य कसे कायम ठेवता येईल हा आहे. या केवळ परंपरा नसून त्यामध्ये विज्ञान सामावलेले आहे. समाज विज्ञानाची तत्वे त्यामध्ये असल्याचे लक्षात येते. आधुनिक काळात आधुनिक समाजाच्या अनेक समस्या व्यक्तीला त्रस्त करीत आहेत. त्यामध्ये नैराश्य ,एकटेपणा तसेच समाजापासून वेगळे झाल्याची भावना यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत.अशावेळी या वैज्ञानिक परंपरांमुळे व्यक्तीला सामाजिक सुरक्षिततेची भावना जगण्याची आश्वासकता प्रदान करेल असा विश्वास वाटतो. त्यामुळे या परंपरा आणि उत्सवामधील वैज्ञानिकता शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments