वरोडा येथील अंबादेवीचे जागृत देवस्थानअंबादेवीने दिले साक्षात दर्शन.

वरोडा येथील अंबादेवीचे जागृत देवस्थान

अंबादेवीने दिले साक्षात दर्शन.

वरोडा, २८ सप्टेंबर


येथील अंबादेवी हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे ते श्रद्धास्थान असून, नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते. जाणकारांच्या मते रेल्वेस्थानक मार्गावरील खांजी या गावाची सरमुकद्दम नामक व्यक्तीकडे मालगुजारी होती. अंबादेवीने त्यांच्या स्वप्नात येऊन साक्षात दर्शन दिले आणि 'मी जमिनीत आहे, मला बाहेर काढ, माझे ठाणे या गावाच्या सीमेवरील जंगलातील टेकडीवर आहे' असा संकेत दिला. त्यानंतर सरमुकदम यांनी गावकऱ्यांसमोर स्वप्नातील सर्व प्रकार कथन केला.

यावेळी दामोदर सातपुते, दिवाणजी झितू वस्ताद, साधू आगलावे, लोहकरे, कृष्णा वरघणे, भाऊराव पवार, भगवान घाटे यांच्या मदतीने सातपुते यांच्या शेतातील जागेची पाहणी करून खोदकामास प्रारंभ केला. त्यावेळी अंबादेवीची शीला त्यांना आढळली. या मूर्तीला बाहेर काढून बैलगाडीवर ठेवले. मात्र, घेऊन जाताना बैलगाडी जागची हलेना. यावेळी बंडीला ओढण्यासाठी अनेक बैल लावल्याची माहिती आहे. यानंतर नागरिकांच्या मदतीने या भागात असलेल्या टेकडीवरील एका बोराच्या झाडाखाली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा जवळपास १०० वर्षांपूर्वीचा इतिहास सांगितला जातो. सरमुकदम यांनी यावेळी गावचे पुजारी दादाजी काळे यांना देवीची पूजा करण्यासाठी आणले. कालांतराने हरिप्रसाद नावाच्या व्यक्तीने आपल्या नावाचा फलक लावत येथे छोटेसे मंदिर उभारले. आज येथे देवीचे भव्य मंदिर उभे आहे.

या मंदिरात गावातील नागरिक नवरात्र उत्सव साजरे करतात. दरम्यान या देवस्थानच्या मालकीची १.१२ हेक्टर जमीन असून, या परिसरातच हे मंदिर असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जयंत टेंभुर्डे यांनी दिली. देवीच्या नवरात्रात या परिसरातील हजारो भाविक अंबादेवीच्या दर्शनासाठी येतात. अंबादेवीचे हे देवस्थान जागृत असल्याची परिसरातील नागरिकांची श्रद्धा आहे. येथे भक्तांनी केलेला मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.

Comments