वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त असून, शासनाने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन करणार आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात येत्या ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता वरोरा शहरातील आंबेडकर चौकात हे आंदोलन भरवण्यात येणार आहे. आयोजकांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या रोगांमुळे सोयाबीन पिक नष्ट झाले असतानाच, अलीकडील अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि भात या पिकांनाही नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीतही राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत केलेला नसल्याचेही आरोप केले जातात. भाजपचे कर्जमाफीचे निवडणूकीतील आश्वासनही फेटाळले गेले आहे, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत.
या आंदोलनाद्वारे शेतकरी चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आणि शेतमालाला योग्य भाव देणे यासहित अनेक मागण्या करणार आहेत.
Comments
Post a Comment