अन्यथा न.प. टॅक्स भरणार नाही.
वरोरा
अनिल नौकरकार
वरोरा : वरोरा रेल्वे स्टेशन ते मोहबाळा चौक या मुख्य रस्त्याची दयनीय स्थितीमुळे व्होल्टास कॉलनीतील रहिवाशांना अनेक वर्षे त्रास सहन करावा लागत आहे. या नियोजित १२ मीटर रुंदीच्या रस्त्यावर जागोजागी एक ते दीड फूट खोल खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहतूक खूपच अवघड झाली आहे. रोजच्या अनेक अपघातांमुळे नागरिक भयभीत आहेत आणि प्रशासनाकडे त्वरित दुरुस्तीची मागणी करत आहेत.
हा रस्ता केवळ व्होल्टास कॉलनीसाठीच नव्हे, तर एमआयडीसीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, शाळकरी मुलांसाठी आणि आजूबाजूच्या खेड्यांमधून येणाऱ्या शेकडो नागरिकांसाठी देखील महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात येथील परिस्थिती आणखीन हलाखीची होते. आनंदवन चौक, सरदार पटेल वार्ड येथील पाणी या कॉलनीत शिरते. नाल्यांची नियमित सफाई न झाल्यामुळे घाण आणि पाणी साचते, ज्यामुळे आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होत आहेत.
कॉलनीतील रहिवासी प्रामाणिकपणे नगरपरिषद कर भरत असतात . टॅक्सचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र गेल्या काही वर्षीपासून नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे स्टेशन चौक ते मोहबाळा चौकापर्यंतचा रस्ता योग्य प्रकारे दुरुस्त करण्यासाठी वरोरा-भद्रावती क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना निवेदन देण्यात आले आहे. या मागणीसाठी बंडूभाऊ लभाने, बंडू कातोरे, अनिल नौकरकार, गजानन महानकर, गोपाल राजपूत, संजय वैद्य, मंगेश मल्हार, अरुण दळवी, रमेश अंड्रस्कर यासहित अनेक रहिवाशांनी आवाज उठवला आहे.
नागरिकांची मागणी आहे की, लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे आणि त्यांना दिलासा द्यावा. अन्यथा नगरपालिकेचा टॅक्स भरणार नाही असाही इशारा दिलेला आहे.
Comments
Post a Comment