मराठा आंदोलनाच्या 8 पैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.


पाच दिवसांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा केली. सरकारने एका तासाच्या आत अध्यादेश काढावा त्यानंतर आम्ही आमच्या घरी आनंदाने जाऊ आणि नंतरच जल्लोष करू असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

मराठा आंदोलनातील प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर लढाई जिंकल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 'जिंकलो रे राजा आपुन' अशी घोषणा केली. त्यानंतर पूर्ण आझाद मैदान पाटील-पाटील या घोषणांनी निनादून गेले.

मराठा आंदोलनाच्या 8 पैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. दोन मागण्यांसाठी मुदत देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या उपसमितीचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली.

मराठा आणि कुणबी एकच आहे या मागणीचा जीआर काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे.


हैदराबाद गॅझेटला मान्यता देण्यास उपसमिती तयार असून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना उपसमितीकडून देण्यात आल्या आहेत.

त्यासह सातारा संस्थानचे गॅझेटियर तपासून कायदेशीर पद्धतीने 15 दिवसांत अंमलबजावणी करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितले आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व मराठा आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेणार असे देखील सांगितले आहे.

आंदोलनादरम्यान वाहनांवर दंड लावण्यात आला तो माफ करण्यात यावा ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे.

हैदराबाद गॅझेटचा एक जीआर, सातारा गॅझेटचा दुसरा जीआर, बाकीच्या मागण्यांचा आणखी एक जीआर काढा, अशी मागणी जरांगे यांनी शिष्टमंडळाकडे केली.

जीआर आल्यावरच जल्लोष करणार'

मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे आणि शिवेंद्र राजे भोसले यांचे शिष्टमंडळ सरकारच्या वतीने आले होते. त्यावेळी मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारच्या शिष्टमंडळाने अध्यादेशाचा मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवला. जरांगे पाटलांनी हा अध्यादेशाचा मसुदा आपल्या सहकाऱ्यांना आणि तज्ज्ञांना दाखवला.

त्यांनी या मसुद्याला मान्यता दिल्यानंतर जरांगे पाटलांनी देखील आपल्याला हा मसुदा मान्य असल्याचे मान्य केले. एका तासात जीआर आल्यावरच आपण जल्लोष करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.



Comments