वरोरा/ चेतन लूतडे
वरोरा : पुण्यात १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेचा वारसा सांगणारा वरोरा शहरातील 'मठाचा राजा' गणपती यावर्षीही भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरत आहे. दत्त मंदिर वार्डातील महादेव देवस्थान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे या ऐतिहासिक गणपतीचे दर्शन भक्त घेत आहेत.
मंडळाचे अध्यक्ष विशाल नागभीडकर यांनी सांगितले, की इंग्रज काळात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या समाजप्रथेनुसार तेव्हापासून हा गणपती दत्त मंदिर वार्डात मांडण्यात येतो. यावर्षी मंडळाने गणपतीच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांच्यासोबत असलेली आठ ते दहा फुट उंचीची मनमोहक मूर्ती स्थापन केली आहे.
हा गणपती केवळ एक उत्सव नसून समाजऐक्याचे प्रतीक आहे. मंडळातील २० सदस्य केवळ गणेशोत्सवाच्याच नव्हे, तर इतर सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतात. दरवर्षी मंडळातर्फे हेल्थ चेक-अप कॅम्प, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वरोरा तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात.
या ठिकाणचा इतिहास खूप महत्त्वाचा आहे. कुरेकर यांच्या शेतातील याच महादेव मंदिराजवळ इंग्रज काळात वरोरा येथील मंडळाच्या पूर्वजांनी गणेशोत्सव मंडळाची स्थापना करून जनजागृतीचा पाया घातला होता. त्या परंपरेला खंड न पडू देता गणपतीची स्थापना दरवर्षी केल्यामुळे या गणपतीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंडळाच्या कार्यात अमोल लोखंडे, मुकेश चांदेकर, शुभम टोरे, सुरज नागभीडकर, रोहित लोणारे, मयूर गुरूनूले, साहिल धाबेकर या सदस्यांचा सहभाग आहे.
*******************
Comments
Post a Comment