वरोरा, २४ ऑगस्ट २०२५: पुढील काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात उत्सवमय वातावरण असणार आहे. वरोरा शहरातही सार्वजनिक गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण यावर्षीही परंपरेप्रमाणेच शांततेच्या व सद्भावनेच्या वातावरणात साजरे करण्यात येणार आहेत. हे दोन्ही उत्सव कोणत्याही गालबोट न लागता भक्तिमय वातावरणात संपन्न व्हावे यासाठी शुक्रवारी सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वरोरा येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व मुस्लिम बांधवांनी या बैठकीत सहभागी होत नेहमीप्रमाणेच बंधुभाव व सद्भावना जपण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिक्षक श्री. संतोष बाकल, सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. अमर राऊत, तहसीलदार श्री. योगेश कौटकर, वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता श्री. सचिन बदकल यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सणादरम्यानची सुरक्षा, वीजपुरवठा, आरोग्यसेवा यासारख्या मूलभूत सुविधांच्या तरतुदीवर चर्चा झाली. सर्वांनी मिळून हे सण शांततेने आणि आनंदात साजरे करण्याचे आवाहन केले. खासदार धानोरकर यांनी सर्व समुदायांना एकत्रितपणे उत्सव साजरे करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
***************
Comments
Post a Comment