वरोरा तालुक्यात अतिवृष्टीचा कोप; शेकडो हेक्टर कापूस पीक नष्ट खासदार धानोरकरांची सरकारला नुकसान भरपाईची मागणी.


वरोरा तालुक्यात अतिवृष्टीचा कोप; शेकडो हेक्टर कापूस पीक नष्ट 

खासदार धानोरकरांची सरकारला नुकसान भरपाईची मागणी.

वरोरा 
चेतन लूतडे 

 चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने शेतकऱ्यांच्या भविष्यावर गदा आणली आहे. बामणडोह नाला उफाळून बाहेर पडल्यामुळे शेकडो हेक्टरवर पसरलेले कापसाचे पीक पाण्याखाली गेले असून ते पूर्णतः नष्ट झाले आहे. मेहनत आणि गुंतवणुकीची सर्व आशा एका क्षणात बुडाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत आणि हतबल झाले आहेत.

या संकटावर मात करण्यासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे आढावा घेतला असून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना धीराचा संदेश देताना म्हटले, "संकट कितीही मोठं असलं तरी प्रत्येक आव्हानांना बळीराजा सामोरे जातो. हे कठीण दिवस नक्कीच निघून जातील."

याच वेळी, खासदार धानोरकर यांनी राज्य सरकारकडे त्वरित योग्य तो उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. "या संकटसमयी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की, कापूस पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी. शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे ही सरकारची जबाबदारी आहे," असे त्या म्हणाल्या.

सध्या प्रशासनाच्या तंत्रीय गटाने नुकसानीचे मूल्यांकन सुरू केले असून, अहवाल तयार झाल्यानंतर नुकसानभरपाई प्रक्रियेस सुरुवात होणार आहे.



Comments