**रोटरीने दिले खेळ साहित्य** **अभ्यासासोबत खेळाचेही महत्त्व**

**रोटरीने दिले खेळ साहित्य**  
 **अभ्यासासोबत खेळाचेही महत्त्व**  

**वरोरा (दि. १४ ऑगस्ट)** : "शालेय शिक्षणात अभ्यासासोबतच खेळ देखील महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यामुळे साध्य होतो," असे प्रतिपादन रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष योगेश डोंगरवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले. "हर घर तिरंगा" अभियानाअंतर्गत सुमठाणा येथील सर्वोदय विद्यालयाला रोटरी क्लबने लेझीम आणि विविध खेळ साहित्य भेट दिले.  
या कार्यक्रमात झेंडावंदनानंतर खेळ साहित्याचे दान करण्यात आले. रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर समीर बारई यांनी भविष्यातही शाळेला मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी राज्यस्तरीय खेळाडूंना पाठिंबा देण्याचेही आश्वासन दिले. शाळेचे मुख्याध्यापक डॉ. सुनील गौरकर यांनी रोटरीच्या सेवाकार्याचे कौतुक केले व आभार मानले. शिक्षक अनिल पाटील यांनी रोटरीच्या समाजकार्याची प्रशंसा करताना म्हटले, "गरजूंना मदत करणारी माणसे संस्कारातून तयार होतात."  
कार्यक्रमाला रोटरी सचिव राहुल पावडे, असिस्टंट गव्हर्नर समीर बारई, रवींद्र शिंदे, डॉ. राहुल शेंद्रे, अभिजीत मणियार, किशोर डोमकावळे तसेच शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन शिक्षक सुरेश गोखरे यांनी केले तर शिक्षक संदीप खिरटकर यांनी आभार प्रदर्शित केले.  

Comments