*आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रस्ते व उड्डाणपुलांच्या कामांसाठी घेतली ना.गडकरी यांची भेट**विविध राष्ट्रीय महामार्गांच्या सद्यस्थितीबाबत सोपवले निवेदन**बल्लारपूर मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा*

*आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रस्ते व उड्डाणपुलांच्या कामांसाठी घेतली ना.गडकरी यांची भेट*

*विविध राष्ट्रीय महामार्गांच्या सद्यस्थितीबाबत सोपवले निवेदन*

*बल्लारपूर मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा*

*आ. मुनगंटीवार यांच्या मागण्यांना ना. गडकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद*

*चंद्रपूर - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध रस्ते व उड्डाणपुलांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी सोपविलेल्या निवेदनांवर ना. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर संबंधित कामांच्या संदर्भात कार्यवाही करण्याचा शब्द दिला.* 

ना.गडकरी यांच्या भेटीत चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रीट करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर निवेदन सादर केले. नेहमीप्रमाणेच ना. गडकरी यांनी संवेदनशीलतेने विषय ऐकून घेतला आणि सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या ठाम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळेच देशातील रस्ते विकासाचा वेग वाढत असून चंद्रपूर जिल्ह्यालाही या विकासप्रवाहाचा मोठा लाभ मिळेल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 

यामध्ये विशेषतः मुल शहरातील वाहतूक समस्येच्या संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी निवेदन सोपवले. सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2, चंद्रपूर यांच्याद्वारे मुल बायपास रस्त्याची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार या मार्गासाठी जमिनीचे अधिग्रहणही पूर्ण झालेले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 930 पासून मुल शहरातील रेल्वे क्रॉसिंगमार्गे उमा नदीच्या पुलाजवळून जाणारा हा बायपास रस्ता सुमारे 6.14 किमी. लांबीचा असेल. या प्रस्तावित बायपास रस्त्यावर एक रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळे त्यावर रोड ओव्हर ब्रिज (ROB) चे बांधकाम करणे आवश्यक आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी ना. गडकरींना सांगितले.

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 मुल-चंद्रपूर (महाराष्ट्र) येतो. या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस चंद्रपूर जिल्ह्यातील जानाला, आगडी, गोंडसावरी, महादवाडी, अजयपूर, चिचपल्ली, वलनी, घंटाचौकी आणि लोहारा ही गावे आहेत. या गावांच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस जुन्या, अरुंद व तुटलेल्या नाल्यांमुळे पावसाचे व सांडपाण्याचे योग्य प्रकारे निस्सारण होत नाही. त्यादृष्टीने मुल-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस RCC काँक्रीट नाली (अंदाजे लांबी 8.00 किमी) मंजूर करणे आवश्यक असल्याची बाब आ. मुनगंटीवार यांनी मांडली. यासोबतच बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्लापूर, मुल, पोंभुर्णा येथील विविध विकासकामांना केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरी देण्याची मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली.

महाराष्ट्रातील मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग (एन.एच. 930) वरील रेल्वे क्रॉसिंग (गेट क्र. जी.सी.एफ. 123) येथे दररोजच्या प्रचंड वाहतुकीमुळे दीर्घकाळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होते. यामध्ये केवळ सामान्य नागरिक, शालेय मुले व आपत्कालीन सेवा (ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड) यांनाच अडथळा निर्माण होत नाही तर आर्थिक व औद्योगिक क्रियांवरही नकारात्मक परिणाम होतो. या समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी संबंधित ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज (उड्डाणपूल) बांधणे आवश्यक आहे, ही बाब आ. मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिली.

Comments