भद्रावती : प्रकृती अस्वस्थतेमुळे जेरबंद केलेल्या अस्वलीचा मृत्यू

भद्रावती : प्रकृती अस्वस्थतेमुळे जेरबंद केलेल्या अस्वलीचा मृत्यू 

भद्रावती 

आयुध निर्माणी क्षेत्रात प्रकृती अस्वस्थ असलेल्या एका सहा वर्षीय अस्वलीला वन विभागाने गेल्या ७ जुलै (सोमवार) रोजी जेरबंद केले होते. तिच्यावर प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले होते, परंतु दुर्दैवाने आज पहाटे त्या अस्वलीचा मृत्यू झाला.  

या अस्वलीची हालचाल कमी झाल्यामुळे भद्रावतीतील वन विभागाच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन करून तिला जाळ्याच्या साहाय्याने पकडले होते. त्यावेळी तिच्या पाच महिन्याच्या दोन पिल्लांना तेथेच सोडण्यात आले होते. वन अधिकाऱ्यांनी प्रथम अस्वलीला भद्रावती येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार केले, त्यानंतर तिला चंद्रपूरला हलविण्यात आले. दुःखद म्हणजे, तिचे प्राण वाचवण्यात वनविभागाला यश मिळाले नाही.  

या संपूर्ण कारवाईत वनपरिचित अधिकारी किरण धानकुटे, क्षेत्र अधिकारी विकास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.  

या घटनेमुळे वन्यजीव प्रेमी आणि पर्यावरणवाद्यांच्या मनावर दुःखाची छाया पसरली आहे. तरुण अस्वलीचा मृत्यू हा वन्यजीव संवर्धनासाठी एक धक्कादायक घटना आहे.  

Comments