बँक ऑफ महाराष्ट्र टेमुर्डा शाखेच्या स्थलांतराच्या निर्णयावर ग्रामस्थांचा विरोध

बँक ऑफ महाराष्ट्र टेमुर्डा शाखेच्या स्थलांतराच्या निर्णयावर ग्रामस्थांचा विरोध

वरोरा 

टेमुर्डा येथे कार्यरत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे आनंदवन येथे स्थलांतर करण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला आहे. मात्र या निर्णयाविरोधात टेमुर्डा ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आज माझी भेट घेऊन बँकेच्या शाखेचे स्थलांतर थांबवावे, अशी लेखी विनंती सादर केली.

ग्रामस्थांनी यावेळी सांगितले की, काही काळापूर्वी बँकेच्या इमारतीच्या छताची गळती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत चिंता व्यक्त करण्यात आली होती. यावर ग्रामपंचायतीने तत्काळ कारवाई करत छताची दुरुस्ती केली असून, बँकेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

तरीही, बँकेने ग्राहकांना विश्वासात न घेता अचानक शाखा स्थलांतराचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे टेमुर्डा सारख्या ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, शेतकरी, महिला व वृद्ध नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी वस्तुस्थिती ग्रामस्थांनी मांडली.

या पार्श्वभूमीवर, मी ग्रामस्थांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले असून, बँकेच्या शाखेचे स्थलांतर थांबवण्याबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याचे त्यांना आश्वासन दिले आहे. यासंदर्भात मी बँक ऑफ महाराष्ट्रचे पुणे येथील व्यवस्थापकीय प्रबंधक तसेच चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र लिहून, टेमुर्डा शाखा यथास्थित सुरू ठेवावी अशी विनंती करेल.

या बैठकीस टेमुर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचित्राताई ठाकरे, उपसरपंच विमलताई वाटोले, माजी उपसरपंच संगीताताई आगलावे, जयश्रीताई बोरेकर, दुर्गाताई आगलावे, प्रतिभा नक्षिने, सुरेंद्र देठे, मयूर विरुरकर, कफिरचंद कोवंगले, नितेश वाटोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments