*बेजबाबदारपणे हायवा चालवून लाखोंचे नुकसान**नागरिकांना अंधारात काढावी लागली रात्र**चालक मद्दधुंद अवस्थेत असल्याचा आरोप*
*नागरिकांना अंधारात काढावी लागली रात्र*
*चालक मद्दधुंद अवस्थेत असल्याचा आरोप*
वरोडा : श्याम ठेंगडी वरोरा
अत्यंत बेदरकार व बेजबाबदारपणे अरुंद रस्त्या- वरून हायवा ट्रक नेत एका ट्रक चालकाने या मार्गावरील अनेक विद्युत खांबांना धडक दिली.रस्त्यावर उभी असणारी दुचाकी वाहने व घराच्या बाहेर असलेले कुलर, शिवाय घरांचे नुकसान करत हा ट्रक समोर जात होता. शेवटी हायवा ट्रकच्या मागचे चाक एका विद्युत खांबाला अडकल्यामुळे हा ट्रक थांबला. यामुळे या मार्गावरील नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागली.
ही घटना वरोडा शहरात 16 जुलै रोज बुधवारला रात्री नऊच्या सुमारास घडली.वरोडा शहरातून जड वाहतूक होऊ नये यासाठी वरोडा बायपास काढला आहे. वणीकडून येणारी वाहतूक या बायपासने केली जाते. मात्र काल रात्री एम एच ३४ बीजी ४२८० क्रमांकाचा दहा चाके असलेला हायवा ट्रक वरोडा शहरात मिलन चौकात पोहोचला. मिलन चौकातून या हायवा ट्रक चालकाने अत्यंत अरुंद अशा रस्त्याने पुढे नेला. परंतु हा रस्ता ट्रक जाण्याइतका सोयीचा नाही. त्यामुळे हा हायवा ट्रक या रस्त्यावरील विद्युत खांबांना धडक देत, मार्गावर असलेल्या नागरिकांच्या दुचाकी तुडवत, घराच्या बाहेरअसलेल्या कुलरला ठोस देत जय भारतीय चौकापर्यंत आला.
जय भारतीय चौकातून हा हायवा समोर निघाला असताना याही मार्गावरील विद्युत खांबांना तो धडक देत समोर जात होता. शेवटी ऍड.दुशट्टीवार यांच्या घराजवळ या हायवाचे मागचे चाक एका विद्युत खांबाला अडकल्यामुळे हा ट्रक समोर न जाता तेथेच थांबला. चालक मद्दधुंद अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हा हायवा एका मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा असल्याचे कळते.
यादरम्यान विद्युत खांबांना धडक दिल्याने विद्युत खांब वाकून त्यावरील तारा तुटून खाली पडल्या. त्यामुळे या परिसरात नव्हे,तर अर्ध्या शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण माजली.घटनेचे वृत्त सर्वत्र पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. परंतु घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व या परिसरात नागरिकांना येण्यास मज्जाव केला.
मात्र यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे जवळपास तीन साडेतीन लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. पोलिसांनी हायवा ट्रक चालक कृष्णा पटेल ( रा. रिवा मध्य प्रदेश) यास ताब्यात घेऊन बेजबाबदारपणे वाहन चालवल्याबद्दल त्याचे वर गुन्हा नोंदविला आहे.
महावितरण विद्युत कंपनीचे कनिष्ठ अभियंता लालसरे यांनी घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला केली असून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
या घटनेत विद्युत वितरण कंपनीचे चार खांब पूर्णपणे निकामी झाले असून आठ विद्युत खांबाचे काम पुन्हा नव्याने उभारावे लागणार आहे. विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता लालसरे यांनी त्वरेने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून आज सायंकाळपर्यंत या भागातील विद्युत प्रवाह सुरू होईल अशी माहिती दिली आहे.
आपल्या एक्टिवा दुचाकीला धडक दिल्याने त्या वाहनावरील आपला मुलगा खाली पडल्याने त्यास दुखापत झाली आहे.त्याचा सॅमसंग कंपनीचा 70000 रुपयाचा मोबाईल खाली पडल्याने फुटला असल्याची तक्रार संदीप अरुण विधाते यांनी पोलीस स्टेशनला केली आहे.
घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अक्षय पवार हे करीत आहेत.
Comments
Post a Comment