*वरोरा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी कुलूप ठोकले, बाजार लिलाव प्रकरणी न्याय न मिळाल्याचा आरोप*

*वरोरा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी कुलूप ठोकले, बाजार लिलाव प्रकरणी न्याय न मिळाल्याचा आरोप* 

वरोरा 

 वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बाजार लिलाव प्रकरणात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करून एका नागरिकाने आज (गुरुवार, ३ जुलै) वरोडा पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप ठोकले. या अनपेक्षित घटनेमुळे पंचायत समिती परिसरात खळबळ निर्माण झाली.  

 प्रकरणाची पार्श्वभूमी:  
टेमुर्डा येथील आठवडी बाजाराच्या लिलावात भाग घेण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आलेल्या अटीनुसार दहा लाख रुपयांचा धनादेश (डिमांड ड्राफ्ट) आवश्यक होता. या लिलावात सहभागी झालेल्या शेख यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश सादर केला होता, परंतु त्याची मुदत जवळपास संपत आल्यामुळे त्यांना लिलावात भाग घेऊ दिले नाही, अशी तक्रार त्यांनी केली.  

 चौकशीची मागणी, परंतु निष्कर्ष नाही:  
या प्रकरणी शेख यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रत्र केली. त्यानंतर पंचायत समितीकडून चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला, परंतु तो अपुरा असल्याचे जाणवल्याने पुन्हा सुधारित अहवाल मागण्यात आला. अधिकाऱ्यांकडून वारंवार पत्रव्यवहार झाला, तरीही ४ महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही पंचायत समितीने कोणतीही सकारात्मक कार्यवाही केली नाही, असे शेख यांनी सांगितले.  

अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप:  
शेख यांच्या म्हणण्यानुसार, पंचायत समितीचे अधिकारी त्यांच्याशी उद्धटपणे वागत असून, *"तुला जे करायचे ते कर"* अशी अरेरावीची भाषा वापरत आहेत. यामुळे नाराज झालेल्या शेख यांनी १ जुलै रोजी वरोडा पोलीस स्टेशनला पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता.  

 कुलूप ठोकून विरोध:  
आज दुपारी दीड वाजता शेख यांनी पंचायत समितीच्या मुख्य दरवाजावर कुलूप लावून प्रशासनाला चुनौती दिली. या घटनेमुळे पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी आणि इतर नागरिक हादरले. घटनेची माहिती मिळताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि शेख यांना तात्पुरते अटक केले. तसेच, पंचायत समितीचे अधिकारी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचले आहेत.  

 पंचायत समितीची प्रतिक्रिया:  
या प्रकरणी पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.  

 पुढील कारवाई:  
या घटनेमुळे पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांच्या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपांना प्रशासन कसा प्रतिसाद देतं, हे पुढील दिवसांत लक्षात येईल.  

Comments