वरोरा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था व घंटागाडी सेवा ठप्प – शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचे निवेदन, तातडीच्या उपाययोजनांची मागणी

वरोरा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था व घंटागाडी सेवा ठप्प – शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचे निवेदन, तातडीच्या उपाययोजनांची मागणी

वरोरा, ता. १८ जुलै –
वरोरा शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, त्यातच कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांची सेवा बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी शिवसेना लोकसभा संघटक यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी, नगर परिषद वरोरा यांना निवेदन सादर करून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.

शहरातील डोंगरावर चौक ते पटेल मेडिकल, गीताश्री मंगल कार्यालय ते कामगार चौक आणि एकार्जुना चौक ते आझाद वार्ड सार्वजनिक शौचालय या भागांतील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. मोठमोठे खड्डे व पावसाचे साचलेले पाणी यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका व सर्वसामान्य नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत.

तसेच, शहरात घंटागाड्यांची सेवा बंद असल्याने अनेक भागांत कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.

त्यामुळे  खराब रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, घंटागाडी सेवा तात्काळ पूर्ववत सुरु करावी,साचलेल्या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावून कीटकनाशक फवारणी करावी व आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी निवेदन देताना शिवसेना माजी शहर प्रमुख संदीप मेश्राम, माजी नगरसेवक दिनेश यादव, किशोर टिपले, माजी उपशहर प्रमुख मनीष दोहतरे, युवासेना माजी तालुका प्रमुख भूषण बुरीले, जावेद शेख, अनिकेत काळे, मोहित गुप्ता आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.

या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला असून, नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


Comments