चेतन लूतडे वरोरा
चिमूर (ता. चंद्रपूर), २२ मे २०२५ :
चिमूर तालुक्यातील ताडोबाच्या जंगलात वसलेल्या पवित्र रामदेगी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून अडवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
आज मंदिरात जाणाऱ्या भाविक महेंद्र महादेव कोळसकर त्यांनी सांगितले की, आज (२२ मे) मंदिरात दर्शनासाठी जात असताना फॉरेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांना आणि इतर भाविकांना चौकीवर थांबवून ठेवले. विशेष बाब म्हणजे, याच मार्गावरून वाघदर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना मात्र मोकळा मार्ग दिला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या मार्गावर रामदेगी गेट असून तेथे नेमलेले वनकर्मचारी पर्यटकांना वाघ्रदर्शन सोईस्कर होण्यासाठी आत सोडतात, तर मंदिरात जाणाऱ्या भाविकांना मात्र थांबवले जाते. हे चित्र गेल्या काही काळात वारंवार दिसून येत आहे. पूर्वी कधीही भाविकांना अडवले जात नव्हते.
भाविकांसाठी अडथळे, पर्यटकांना मुभा – हे कोणत्या न्यायाने?
ताडोबाच्या जंगलात वसलेले रामदेगी हे मंदिर अत्यंत प्राचीन असून ते पुरातन वारसा ठिकाणांमध्ये गणले जाते. भाविक येथे नियमितपणे दर्शनासाठी येत असतात. मात्र, वाघदर्शनाचे आकर्षण वाढल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आहेत. पर्यटकांना वाघ्रदर्शन सोयीस्कर होण्यासाठी जंगलामध्ये नेमलेले वन कर्मचाऱ्यांसोबत पहारेकरी सुद्धा भ्रमणध्वनीवर संपर्क साधून वाघाची पोझिशन जिप्सीला सांगितली जाते. मात्र भाविकांना भूलथापा देऊन त्या ठिकाणावरून लवकरात लवकर जाण्यास सांगतात. या आधी सुद्धा भाविकांना असाच संघर्ष करून देवस्थानला जाण्याचा मार्ग मोकळा करावा लागला होता.
या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी पर्यटकांना अधिक प्राधान्य देत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे धार्मिक स्थळात जाण्याचा हक्क गमावत असल्याचे जाणवत आहे.
भाविकांसोबत अन्याय थांबवावा – अशी त्यांची मागणी
"धार्मिक स्थळ हे सर्वांसाठी खुले असते, त्यावर अशी बंधने लादणे चुकीचे आहे. आमच्यासारख्या भाविकांना थांबवले जाते, तर पैसे देणाऱ्या पर्यटकांना मात्र मुभा दिली जाते, याचा अर्थ काय?" असा सवाल कोळसकर यांनी उपस्थित केला.
स्थानिक प्रशासन व वनविभागाने यावर तातडीने योग्य तो निर्णय घेऊन भाविकांची गैरसोय टाळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment