10 वी व 12 वी परीक्षेत अव्वल आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयातर्फे सत्कार*


*10 वी व 12 वी परीक्षेत अव्वल आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयातर्फे सत्कार*

           चंद्रपूर, दि. 27 मे :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत 8 शासकीय, 24 अनुदानित व 1 एकलव्य आश्रम  शाळा चालविल्या जातात.  शैक्षणिक सत्र 2025 पासून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी, संपूर्ण प्रकल्पातील शासकीय/ अनुदानित/एकलव्य आश्रम शाळेतुन इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत आलेल्य पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे,

त्या अनुषंगाने प्रकल्प कार्यालय चंद्रपूर येथे नुकताच विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक व शिक्षक यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तर प्रमुख अतिथी म्हणून गिरीश पोळ (सहा, प्रकल्प अधिकारी), राजीव बोंगिरवार (सहा प्रकल्प अधिकारी), राजेश धोटकर (सहा. प्रकल्प अधिकारी), कार्यालयातील सर्व कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी प्रकल्प अधिकारी श्री. राचेलवार म्हणाले, बोर्डाच्या परिक्षेत गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रथमच सत्कार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. दरवर्षी प्रकल्पात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना 10 व 12 वी नंतर करीअर निवडीचे मार्गदर्शन केले.

 *इयत्ता 10 वी तील गुणवंत विद्यार्थी :* 1) शितल भुजंगराव कन्नाके, प्रथम (अनुदानित आश्रम शाळा, राजुरा) 2) सानिया छबिलदास सिडाम द्वितीय (अनुदानित आश्रम शाळा, राजुरा), 3) आराधना अनिल कुंभरे तृतीय (अनुदानित आश्रम शाळा, सरडपार)

*इयत्ता 12 वी (विज्ञान) मधील गुणवंत विद्यार्थी :* 1) अमन दिपक कोडापे- प्रथम (अनुदानित आश्रम शाळा, भारी 2) दिपाली कैलास येरमे - द्वितीय (अनुदानित आश्रम शाळा, गडचांदूर)

*इयत्ता 12 वी (कला) मधील गुणवंत विद्यार्थी :* 1) सुशिला विजय गावडे ,प्रथम (अनुदानित आश्रम शाळा, सरडपार) 2) विद्या सुर्यभान आत्राम,द्वितीय (शासकीय आश्रम शाळा, देवाडा)

 *फोटो कॅप्शन :* गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार

००००००

*गट पीक प्रात्यक्षिके*

*तूर व सोयाबीनचे प्रात्यक्षिककरिता 100 टक्के अनुदानावर मोफत बियाणे*

       चंद्रपूर, दि. 27 मे : गट पीक प्रात्यक्षिके अंतर्गत तूर व सोयाबीन पिकाच्या प्रात्यक्षिककरीता 100 टक्के अनुदानावर मोफत बियाणे मिळणार आहेत. त्यासाठी शेतक-यांनी महाडीबीटी वर अर्ज करावे, असे कृषी विभागाने कळविले आहे.

*पात्र लाभार्थी :* शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ. संस्था यांची (31मार्च 2024 पूर्वी) आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इः संस्था

पीक प्रात्यक्षिकाची अंमलबजावणी करताना शेतकरी निवड सर्वसाधारण 75 टक्के,अनुसूचित जाती 17 टक्के व अनुसूचित जमाती 8 टक्के या प्रमाणे करण्यात येईल. (लाभाध्यांपैकी 30 टक्के महिला लाभार्थी निवडले जातील) एका कुटुंबातील (पती, पत्नी व 18 वर्षाखालील अपत्य) एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल.  प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटात 25 पेक्षा जास्त शेतकरी असल्यास संबंधित गटाने 25 शेतकऱ्यांची निवड करावी. पिक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटभ्‍ पोर्टलद्वारे नोंदणीकृत शेतकरी गट / कंपनी / संस्था निवड प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येईल.

गटामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या तंत्रज्ञानाप्रमाणे पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यास तयार असतील अशाच शेतकऱ्यांची निवड लाभार्थी म्हणून करावी. लाभार्थी गटाची निवड ही महाडीबीटी पोर्टलद्वारे होणार असल्याने कृषी विभागाकडील विहित नमुन्यातील हमीपत्र देण्यास तयार असावे. प्रात्यक्षिकाच्या लाभार्थीसाठी मृदा आरोग्य कार्ड मृदा चाचणी/केलेली असावी.

*अर्ज प्रक्रिया :* शेतकरी बांधवांनी 26 ते 29 मे 2025 या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर आपले अर्ज सादर करावेत.

*निवडीचे निकष :* या योजनेसाठी "प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या तत्त्वावर शेतकऱ्यांची निवड केली जाईल. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या 29 मे 2025 रोजी सायंकाळपर्यंत महाडीबीटी पोर्टलबर उपलब्ध होतील. तसेच निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वैयक्तिक संदेश (SMS) देखील प्राप्त होतील. 

*बियाणे उचलण्याची मुदत :* निवड झालेल्या शेतकऱ्यांनी संदेश मिळाल्यानंतर 5 दिवसांच्या आत संबंधित तालुकास्तरीय अधिकृत डीलरकडून बियाण्याची उचल करणे आवश्यक आहे. मुदतीत बियाणे उचल न झाल्यास, सदर लाभ रद्द होऊन नवीन लाभार्थ्यांची निवड केल्या जाईल.

 शेतकरी बांधवांनी नमूद केलेल्या मुदतीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

००००००

Comments