चंद्रपूर, दि. 13 एप्रिल : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयच्या वतीने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, पाटण येथे उन्हाळी शिबिराचे उद्घाटन प्रकल्प आधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष अतिथी पोलिस उपनिरीक्षक श्री. कोकोडे, उद्योजक प्रफुल खोब्रागडे, सहायक प्रकल्प अधिकारी डी. जी. एम. पोळ, आर. एस. बोंगिरवार, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम. डी. गिरडकर, मुख्याध्यापक, प्रशिक्षक/मार्गदर्शक, शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी खोब्रागडे यांनी उन्हाळी शिबिरातून उद्योजक तयार करण्याच्या या उपक्रमाचे तसेच विद्यार्थ्यांना उद्योजक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध केल्याबद्दल प्रकल्प कार्यालयाचे कौतुक केले. तर अशा उपक्रमातून आदिवासी विद्यार्थी हा समाजात मानाचे स्थान प्राप्त करू शकेल, असे मत श्री. कोकोडे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषण करतांना प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, आदिवासी समाज हा प्रगतशील समाज म्हणून उदयास येणे गरजेचे आहे. त्याकरीता अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांकरीता राबविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे या शिबिरात १. योगा प्रशिक्षण २. आर्चरी प्रशिक्षण ३. गोंडी व वारली पेटींग प्रशिक्षण ४. तायक्वांडो प्रशिक्षण ५. व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण ६. इंग्लीश स्पिर्कीग कोर्स ७. बांबु आर्ट ८. शिलाई मशीन प्रशिक्षण ९. अगरबत्ती तयार करणे, असे विविध उपक्रमांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती दिली. आदिवासी विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर उभा राहून आपली प्रगती करण्यासाठी त्याला खरोखर मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्यासाठी अशा प्रकारचे उन्हाळी शिबीर हे एक उत्तम मार्गदर्शक ठरेल असे श्री. राचेलवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. प्रकल्प अधिकारी आर. एस. बोंगिरवार यांनी केले. संचालन श्री. पूणेकर यांनी तर आभार शिक्षिका दुर्गे यांनी मानले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व अधिकारी तसेच प्रकल्पातील मुख्याध्यापक/ अधिक्षक तथा शासकीय आश्रम शाळा येथील कर्मचारी आदी उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment