रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी फिल्डवर** क्षेत्रीय भेटीदरम्यान जाणून घेतल्या मजुरांच्या समस्या*

*रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी फिल्डवर*

* क्षेत्रीय भेटीदरम्यान जाणून घेतल्या मजुरांच्या समस्या*

चंद्रपूर , दि 24 एप्रिल : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्षेत्रीय भेटी देऊन विकासकामांची पाहणी करीत आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच बसत असला तरी त्याची पर्वा न करता भर उन्हात जिल्हाधिका-यांनी पोंभुर्णा तालुक्यात भेट देऊन मजुरांशी संवाद साधला.

23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी पोंभुर्णा तालुक्यातील मौजा घनोटी तुकूम येथील मजगी कामाची पाहणी केली. यावेळी तेथे कामावर असलेल्या कामगारांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मार्गदर्शन सुध्दा केले. यावेळी जिल्हाधिका-यांनी तालुक्यातील विविध विकासकामांना भेटी देऊन प्रगतीचा आढावा घेतला.

क्षेत्रीय भेटीदरम्यान मौजा आंबेधानोरा येथे अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच तलाठी कार्यालयाची तपासणी करून मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मौजा उमरी पोतदार येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. तसेच बळीराजा शेत पाणंद रस्ताच्या कामाला भेट दिली. पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी वैद्यकीय अधिका-यांसोबत रुग्णालयातील वार्ड, भरती असलेले रुग्ण, त्यातील यंत्र सामुग्री, औषध उपलब्धता व इतर आरोग्य विषयक सोई सुविधाबाबत तपासणी करून आढावा घेतला. तसेच पोंभूर्णा येथील महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे अगरबत्ती प्रकल्पाची सुध्दा त्यांनी पाहणी केली. मौजा चिंतलधाबा येथील ग्रामपंचायत क्रीडांगण काम, मनरेगा अंतर्गत 650 वृक्ष लागवड केलेल्या कामास भेट देऊन मार्गदर्शन केले.

सदर दौ-याच्या वेळी गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार रेखा वाणी, गटविकास अधिकारी विवेक बेल्लालवार, जि.पं.बांधकाम उपविभागीय अभियंता श्रीमती जोशी, पोलीस निरिक्षक राजकमल वाघमारे, नायब तहसिलदार रामकृष्ण उईके, मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके व सुरेंद्र चिडे यांच्यासह गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सहा.कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, ग्रामरोजगार सहाय्यक व गावातील नागरीक उपस्थित होते.

००००००

Comments