तुकूम परिसरातील बियाणी पेट्रोल पंपावर एका ग्राहकासोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ होतोय वायरल.

तुकूम परिसरातील बियाणी पेट्रोल पंपावर एका ग्राहकासोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ होतोय वायरल.

चंद्रपूर 

 समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नाण्यांद्वारे पैसे देण्यास नकार देत ग्राहकाच्या वाहनातील इंधन काढून टाकल्याची ही घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेजर गेटसमोर पानठेला चालवणाऱ्या एका व्यावसायिकाने आपल्या दुचाकीसाठी बियाणी पेट्रोल पंपावर इंधन भरले. पेट्रोल भरल्यानंतर त्याने १० रुपयांच्या नाण्यांद्वारे (एकूण ९ नाणे) पेट्रोलची रक्कम अदा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी नाणी स्वीकारण्यास नकार दिला. ग्राहकाने नाणी ही कायदेशीर चलन असल्याचे सांगून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी नाणी घेण्यास स्पष्ट नकार दिला.
ग्राहकाकडे इतर रोख रक्कम नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्या वाहनातील संपूर्ण पेट्रोल काढून टाकले. ही कृती करत असतानाचा व्हिडिओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केला. काही वेळातच हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, पंप व्यवस्थापनाच्या या भूमिकेवर टीका केली जात आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कोणतेही वैध नाणे किंवा नोटा स्वीकारण्यास नकार देणे बेकायदेशीर आहे. ग्राहकाने याच नियमाचा हवाला दिला होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी नियमांना तिलांजली देत ग्राहकाला अपमानास्पद वागणूक दिली.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “ग्राहकाने कष्टाने कमावलेल्या पैशांची अशी अवहेलना करणे अयोग्य आहे. प्रशासनाने यावर तत्काळ कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, ग्राहकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात असून, जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. पंप व्यवस्थापनाने ग्राहकांप्रती अधिक संवेदनशील राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या घटनेवर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments