*वरोरा शहरात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या हरणाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू** वरोरा शहरातील टिळक वार्ड येथील घटना
वरोरा शहरातील टिळक वार्ड येथील घटना
वरोरा
चेतन लूतडे
*वरोरा, गुरुवार*: उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वरोरा शहराच्या मध्यभागी आलेल्या एका हरणाचा गुरुवारी सकाळी मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये नवल व्यक्त केले जात आहे. टिळक वार्ड येथील गजानन मंदिरच्या पाठीमागे मोकळ्या जागेत घटनाक्रम घडला.
सकाळी मंदिराच्या पाठीमागील भागात कुत्रे एका हरणाचा पाठलाग करीत असल्याचे नागरिकांनी पाहिले. हरीण लपून राहण्याच्या प्रयत्नात ठाकरे व मून यांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस आडवे झाले. तथापि, गावातील मोकाट कुत्र्यांच्या गटाने त्यावर हल्ला चढवून जखमी केले व अखेर त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यादरम्यान कुत्र्यांनी हरणाचा काही भाग खाल्ल्याचेही निदर्शनास आले.
घटनानंतर मंदिर परिसरात हरीण पाहण्यासाठी बरीच नागरिकांची गर्दी जमली. यावेळी त्यांनी घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. तथापि, वनकर्मचारी पोहोचेपर्यंत हरीण जागच्या जागी मृत अवस्थेत पडले होते. सध्या हरणाचे शव वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. वनविभाग वरोरा चे वनपाल र.राठौड़,वन रक्षक अमोल टिकट,वन रक्षक दीपन मडावी आपस संस्थेचे अध्यक्ष विशाल मोरे उपस्थित होते.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची तपासणी सुरू केली असून, हरण शहरात कोणत्या मार्गाने आले याची चौकशी केली जात आहे. यावेळी नागरिकांमध्ये चर्चा आहे, की उन्हाळ्याच्या झळांमुळे पाण्याच्या शोधात हे हरीण वन्य प्रदेशातून वरोरा शहरात येऊन पोहोचले असावे. हरणासारख्या वन्य प्राण्यांचे शहरी भागात दिसणे योगायोग नसून, पर्यावरणीय समतोलाच्या दृष्टीने ही घटना गंभीर आहे, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.
या संदर्भात वनविभागाने मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्याचे ठरवले आहे. तसेच, पाण्याच्या टँकर्सद्वारे वन्य प्राण्यांच्या विस्तारक्षेत्रात पाणीपुरवठा करण्याच्या योजनांवर विचार चालू आहे.
Comments
Post a Comment