ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

माजरी

माजरी (चंद्रपूर) : पाटाळा फाट्याजवळील ओव्हरब्रीज जवळ दुचाकी व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला. ही घटना माजरी- वरोरा - वणी राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. गिरीश अशोक धवस (२३) असे मृतक युवकाचे नाव आहे.

वरोराच्या मोकाशे ले आउट येथे राहणारा गिरीश धवस हा काही कामानिमित्त सकाळच्या सुमारास वरोऱ्याकडून वणीकडे जात होता. दरम्यान, वरोरा वणी महामार्गावर पाटाळा फाट्याजवळ ओव्हरब्रीजवर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच ३४ बीजी ७००१) दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गिरीश हा गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी शेंबळ टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेला फोन करून घटनेची माहिती दिली. रुग्णवाहिकेतून जखमी युवकाला उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी चालक ट्रक घेऊन वरोऱ्याकडे जात असताना माजरी पोलीस दलातील वाहतूक पोलीस एकनाथ बोरकुटे यांनी पाठलाग करून वरोर्यातील शगुन लॉन समोरील रस्त्यावर ट्रकला अडविले. ट्रकचालक राजकुमार दशरथ कैथल याला अटक करून ट्रक जप्त केला. याप्रकारणी पुढील तपास माजरीचे ठाणेदार अमितकुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनात माजरी पोलीस करीत आहेत.

सीसीटीव्ही फक्त टोल वसुलीसाठी

सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत आवश्यक देखरेख प्रदान करतात. त्यामुळे वरोरा - वणी महामार्गावरील पाटाळा फाट्यावर ओव्हरब्रीजच्या लेनमध्ये वाहतूक व्यवस्थापन, देखरेख आणि सुरक्षिततेसाठी हाय-रिझोल्यूशन नाइट-व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची अत्यंत गरज असताना देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पाटाळा फाट्याजवळ ओव्हरब्रीजवर सीसीटीव्ही नसल्यामुळे या महामार्गावर अपघात करून वाहन चालक पसार होण्यास यशस्वी होत आहेत.

Comments