जिल्हाधिका-यांकडून पूरग्रस्त क्षेत्रातील व्यवस्थापनाचा आढावा*

*जिल्हाधिका-यांकडून पूरग्रस्त क्षेत्रातील व्यवस्थापनाचा आढावा*

अकूंश अवथे 

*चंद्रपूर, दि. 6 :* जुलै महिन्यात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह प्रशासनातील अधिका-यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला व संबंधित यंत्रणेला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आणि व्यवस्थापनाचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सोमवारी आढावा घेतला.
वीस कलमी सभागृह येथे झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी (महसूल) दगडू कुंभार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्य, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, मनपा उपायुक्त मंगेश खवले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके (पंचायत), कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे) प्रियंका रायपूरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आदी उपस्थित होते. 
जुलै महिन्यात चिचपल्ली, पिंपळखुट, चेक बल्लारपूर, देवाडा (खुर्द), जुनासुर्ला, वेळवा, आष्टा व इतर गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या गावात विविध विभागाच्या वतीने करण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चिचपल्ली येथील नाल्यावरील अतिक्रमण हटवून पुनर्वसनाबाबतचा आराखडा त्वरीत सादर करावा तसेच नाल्याचे खोलीकरण करावे. फुटलेल्या तलावाची पाळी त्वरीत दुरुस्त करावी, पुलांचे रुंदीकरण, क्षतीग्रस्त रस्त्यांचे बांधकाम, जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती व रंगरंगोटी आदींचे आराखडे तयार करावे. 
देवाडा (खुर्द) – तोडगाव रस्त्याचे अंदाजपत्रक सादर करावे. वेळवा येथील पुलाचे बांधकाम करणे, जाम – तुकूम नाल्याचे खोलीकरण करणे, सोबतच जमीन खरवडून गेली असल्यास प्रस्ताव पाठविणे, गावातील सर्व पूरपिडीतांचे गांभिर्याने पंचनामे करणे, झालेल्या पंचनाम्याचे चावडी वाचन करणे, पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला की नाही, याची खात्री करणे, पूरग्रस्त गावांमध्ये साथरोग पसरू नये, यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी करावी. तसेच ब्लिचिंग पावडर, गप्पी मासे आदी उपाययोजना कराव्यात. ग्रामपंचायतींना निर्देश देऊन सांडपाण्याची व्यवस्था करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.
यावेळी विविध विभागाचे प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.
०००००००

Comments