वाघोली लगतच्या जंगलाला लागलेल्या आगीचा वन्य प्राण्यांना फटका

वाघोली लगतच्या जंगलाला लागलेल्या आगीचा वन्य प्राण्यांना फटका 

वरोरा : 13/5/24
अनिल पाटील वरोरा 
तालुक्यातील शेगाव (बु) परिसरातील वाघोली लगतच्या जंगलाला दि.१ मे २०२४रोजी अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणे वनसंपदा जळाली. याचा फटका वन्य प्राण्यांना बसला असण्याचे  म्हटले जाते.
 वरोरा तालुक्यातील शेगाव (बु) परिसरातील वाघोली लगतच्या कक्ष क्रमांक दहा मध्ये ६६२ हेक्टर आर वन विभागाचे क्षेत्र आहे. या परिसरात पाच वाघांसह मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे . दाट जंगलाचे स्वरूप असलेल्या या ठिकाणी १ मे २०२४ रोजी दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीने काही तासातच रुद्र रूप धारण केले होते. ही माहिती मिळताच वनविभागाचे  टेमूर्डा क्षेत्र सहाय्यक चांभारे, शेगाव क्षेत्र सहाय्यक जे. के. लोणकर, वनरक्षक जी.एम बोढे आणि वनरक्षक अमोल तिखट तसेच वन मजुरांनी लगेच घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत त्यांना जंगलाला लागली  आग नियंत्रणात आणण्यात यश आले. परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळाल्याचे घटनास्थळी दिसून येते. दरम्यान या आगीचा सदर क्षेत्रातील पाच वाघांसह अन्य वन्य प्राण्यांना फटका बसला असून त्यांनी आपले बस्तान दुसरीकडे वळविले असावे असा अंदाज आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नसले तरी लगतच्या गावातील खोडकर ग्रामस्थांनी ही आग लावली असावी अशी शंका वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


शेगाव (बु) च्या कक्ष क्रमांक १० परिसरात काही नाले असून या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती साठा आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही रेती तस्कर मध्यरात्रीनंतर व पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा वनविभागाच्या हद्दीतून करीत असल्याची चर्चा परिसरात आहे. यात महालगाव येथील दोन ट्रॅक्टर मालकांचा सहभाग असल्याचे म्हटले जाते. त्यातील एक ट्रॅक्टर चालकाचा नातेवाईक वनमजुराचे काम करीत असल्याची व त्याच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याची चर्चा आहे. वनविभागाच्या हद्दीत काही बंधारे बांधण्यात आले असून त्या ठिकाणी देखील वनविभागाच्या हद्दीमधीलच रेतीचा वापर झाला असल्याचे म्हटले जाते. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन चौकशी आणि कारवाई करण्याची गरज आहे.

Comments