चोराच्या उलट्या बोंबा ,*अरुणोदय कोल एजन्सी मधील ३४ कामगाना काढले.*कोळसा चोरी उघडकीस आणल्याने कारवाईचा बडगा *अन्यायग्रस्त कामगारांचा पत्रकार परिषदेतून आरोप *आंदोलनाचा दिला इशारा
*अरुणोदय कोल एजन्सी मधील ३४ कामगाना काढले.
*कोळसा चोरी उघडकीस आणल्याने कारवाईचा बडगा
*अन्यायग्रस्त कामगारांचा पत्रकार परिषदेतून आरोप
*आंदोलनाचा दिला इशारा
वरोरा : तालुक्यातील एकोणा या खुल्या कोळसा खाणीमध्ये अरुणोदय कोल एजन्सी रायपूर,ही कंत्राटदार कंपनी मागील काही वर्षापासून काम करत आहे. या कंपनीने दीड वर्षापासून कामावर असलेल्या ३४ कामगारांना २ एप्रिलच्या एका पत्रान्वये अचानक कामावरून काढून टाकल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
वेकोली अधिकाऱ्यांच्या संगनमताने अरुणोदय कंपनीतील अधिकारी कोळसा चोरी करीत असल्याने व ती चोरी उघडकीस आल्याने सदर कामगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचा आरोप कामगारांनी आज रविवार दिनांक ७ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे. तसेच अन्यायाविरुद्ध आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.
वरोरा तालुक्यातील एकोणा येथे खुली कोळसा खान आहे. या खाणीमध्ये रायपूर येथील अरुणोदय कोल एजन्सी ही कंत्राटदार कंपनी विविध कामे करीत आहे. या कंपनीमध्ये शेकडो कामगार कामावर आहेत. ९ मार्च रोजी रात्री या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून कोळसा चोरी केला जात असताना सुरक्षारक्षकाच्या समय सुचकतेमुळे प्रकार उघडकीस आला. आणि वेकोली व्यवस्थापकाच्या पुढाकारानंतर चोरी करणाऱ्यांवर पोलीस तक्रारी वरून , कोळसा चोरणार्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले. तसेच कोळसा भरून देणारी कॅट मशीन आणि कोळसा वाहून नेणारा ट्रेलर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे .या प्रकरणाची चौकशी चंद्रपूर गुन्हे शोध विभागातर्फे सुरू आहे.
दरम्यान ही चोरी उघडकीस करणाऱ्यांमध्ये अरुणोदय कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचा समावेश असल्याचे म्हटले जाते. आणि याच कारणामुळे ३४ कामगारांवर संशय व्यक्त करून त्यांना कंपनीने २ एप्रिलच्या एका आदेशान्वये कामावरून अचानक काढून टाकले आहे. कामावरून कमी करताना कंपनीने एकोणा गावातील रस्त्याचा संदर्भ दिला आहे. रस्त्याच्या कामामुळे कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याने सध्या ट्रीप मॅन, फ्लॅग मॅन, हेल्पर, वेल्डर यांची आवश्यकता कंपनीला नसल्याने त्यांना कंपनी कामावरून काढत असल्याचे पत्रात म्हटले आहे. कंपनीने काढून टाकलेले कामगार एकोणा, वनोजा, चरूर खटी ,मारडा या गावातील कामगार आहे. कोळसा खाणीसाठी जमीन संपादित करताना शेतमालकांना मोबदला व कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात आली. तर शेतमजुरांना कंत्राटदार कंपनीकडे कामावर घेण्यात आले. परंतु अरुणोदय कोल एजन्सीने अशा ३४ कामगारांना अचानक कामावर काढल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीने रस्त्याचा संदर्भ कामावर काढताना दिला असला तरी त्यामागचे कारण वेगळेच असल्याचा आरोप अन्यायग्रस्त कामगारांनी वरोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे.
आज रविवार दि.७ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कामगारांनी आपली बाजू मांडताना कंपनीवर गंभीर आरोप केले आहे. अरुणोदय कोल एजन्सी आणि वेकोलीचे काही अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी केली जात असून ही चोरी ९ मार्च रोजी उघडकीस आणल्याने या कामगारांना कामावरून काढून टाकल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. आठवड्याला १८ ते २० ट्रेलर भरून कोळसा चोरी होत असल्याचे म्हटले जात असून याचे बाजार मूल्य दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. हा प्रकार मागील काही वर्षापासून सुरू असल्याने हजारो करोड रुपयांचा घोटाळा या माध्यमातून झाला असण्याची शक्यता आहे. दरम्यान उघडकीस आलेल्या चोरी प्रकरणाची सर्वांकष चौकशी झाल्यास अरुणोदय कॉल एजन्सी व वेकोलीच्या अनेक अधिकाऱ्यांचा खरा चेहरा समोर येऊ शकणार आहे.
दरम्यान कामावरून काढलेल्या ३४ कामगारांनी कामगार न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याचे देखील त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था असताना कोळसा चोरी कशी
विकोली मधून निघणारी ओवी आणि कोळसा वेगवेगळ्या ठिकाणी टाकला जातो. यांच्या जागेतील अंतर सुमारे दोन ते तीन किलोमीटर असावे. असे असताना माती टाकण्याच्या जागेवर कोळसा टाकला जातो. व रात्रीच्या अंधारात अरुणोदय कोल एजन्सी मध्ये काम करणारी कॅट मशीन ट्रेलर मध्ये कोळसा भरून देते व तो ट्रेलर बिनभोगाटपणे बाहेर पडतो. कोळसाखान परिसरात जाणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या मार्गावर सीआयएसएफ चे जवान गस्त घालत असतात. अनेक ठिकाणी अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.आत मध्ये जाणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी होते. मग असे असताना कोळसा चोरी करणारी वाहने कोळसा घेऊन बाहेर कशी पडतात असा प्रश्न आहे. अरुणोदय कोल एजन्सी आणि वेकोली यांच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताशिवाय हा प्रकार शक्य आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. परिणामी यासंदर्भात निष्पक्ष चौकशी झाल्यास कोळसा माफियांकडून होणारी कोळशाची लूट आणि त्यात सहभागी असणाऱ्या. सर्वांचा बुरखा फाटणार आहे.
Comments
Post a Comment