तब्बल तीन दशकांनी फुटला आठवणींचा बांध**भावुकतेच्या मैत्री भेटीने डोळ्यात अश्रूंच्या धारा**भद्रावती येथे 33 वर्षाच्या मैत्रीचे स्नेहमीलन*

*तब्बल तीन दशकांनी फुटला आठवणींचा बांध*
*भावुकतेच्या मैत्री भेटीने डोळ्यात अश्रूंच्या धारा*
*भद्रावती येथे 33 वर्षाच्या मैत्रीचे स्नेहमीलन*
भद्रावती प्रतिनिधी-
आधुनिक काळातील सोशल मीडियामुळे जग जवळ आलय हे मात्र खरं पण आपण ही यांच्या प्रमाणे कधीतरी ऑफलाईन राहून आपल्या प्रिय माणसांना मनापासून भेटुया...एकमेकांचे हितगुज समोर बसून वाटून घेवूया.. सदिच्छा व्यक्त करूया आणि प्रत्येक क्षणाच्या गोड आठवणी मनात जपुन ठेवूया...हीच संकल्पना मनी हेरून भद्रावती येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे सन 1990-91 या वर्षी वर्ग 10 वी मध्ये शिकत असलेल्या सर्व जुन्या मित्र मैत्रिणींच्या आठवणींचा अखेर बांध फुटला..अन स्थानिक शिंदे मंगल कार्यालयात पार पडलेल्या त्यांच्या स्नेहमिलन सोहळ्यात प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा ओसंडून वाहू लागल्या... हा भावुकतेचा क्षण कधीच विसरता येणार नाही असे बोल प्रत्येकाच्या मुखी ऐकावयास मिळाले.

खऱ्या मैत्रीच्या भेटीची अनुभूती आजच्या पिढीला आदर्श देऊन गेली असे म्हणायला हरकत नाही कारण मैत्री ही न सांगता होते. इथे आनंद असो वा दुःख चेहऱ्यावरुन व्यक्त न होता, न सांगता डोळ्यातून कळतो. मैत्री कळण्यासाठी सोशल मीडियावर जवळ न येता, सहवासात जवळ आलं तर आयुष्याचं एक सोनेरी पान उघडल्यासारखा अनुभव येतो यासाठी एकमेकांना भेटण गरजेचं असत.यामुळेच हे लक्षात घेत या सर्व मित्रांनी गेट टू गेदर म्हणजेच मेळावा आयोजित केला होता.
आपण तब्बल 33 वर्षांनी पुन्हा भेटणार आहोत या हुरहुरीत मात्र आपल्या त्या काळातील आदर्श शिक्षकांना ते विसरले नाही याच कौतुक देखील तितकंच महत्वाचं आहे.प्रसंगी आपल्या या सोहळ्याला द्विगुणित करण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय गावंडे गुरुजी,गोवर्धन गुरुजी,अशोक लोखंडे,वासुदेव गीते,संजय महाले,अजय पोहारे तसेच नागपूर येथील प्रतिष्ठित अभियंता रुपराव कांबळे यांचेसह याच मित्रांमधील आपल्या जीवनात उच्च पदावर सर करून गेलेल्या सुहास बोबडे,सुभाष बांदूरकर आणि या मैत्रीच्या भरत भेटीला जिकरीने मेहनत घेणारे आशिष ठेंगणे,विना जूनघरे व सुनंदा खंडाळकर यांची उपस्थिती होती.
         33 वर्षापूर्वी सोबत असलेले हे मित्र आपल्या जीवनाच्या पुढील वाटचालीसाठी कुणी ठरविलेल्या किंवा मिळेल त्या मार्गाने मार्गस्थ झाले.त्यानंतर कोण कुठं आणि कशा परिस्थितीमध्ये आहे याची जाण कुणाला नव्हती आणि कदाचित कुणी तसा प्रयत्न देखील केला नसावा.
मात्र जवळपास आज सर्वांनी आपली पन्नासी गाठली..
प्रत्येकांनी आपापल्या पिढीला त्यांचा मार्ग दाखवून आपले कर्तव्य पार पाडले. मग आता पुढे करायचे काय...जसे आपण आपल्या जीवनात आपली पिढी घडवायला व्यस्त होतो तशीच अवस्था त्या पिढीची राहील...मग उरला तो जीवनाचा एकटेपणा...हीच भावना सर्वांच्या मनी बोचायला लागली आणि याच एकटपणाच्या अनुभवाने खरी अर्जुनाची भूमिका बजावली ती म्हणजे आशिष ठेंगणे यांनी...त्याने या मोहिमेत साथ घेतली विना जूनघरे आणि सुनंदा खंडाळकर यांची...यासाठी सोशल मीडियाचा वापर करत स्थानिक भद्रावती येथे वास्तव्यास असलेल्या आणखी मित्रांना घेऊन एक एक करून मित्रांच्या गाठी बांधायला सुरवात केली...हे सर्व करत असताना अनेक अडचणी आल्यात याचा अनुभव आशिष ठेंगणे जेव्हा मंचावर बोलताना व्यक्त करत होते त्यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा ओसंडून वाहत होत्या...हे सर्व बघून मंचावर उपस्थित मान्यवरांचे देखील डोळे पाणावलेले दिसून येत होते..आपल्या या स्नेहभेटीची वेळ कधीच संपू नये असे सर्वानाच वाटत होते...कारण या संपूर्ण दिवसाच्या सोहळ्यात सर्वांनी आपापले वय विसरुन भरपूर धमाल केली.संगीताच्या तालावर थिरकने,गाणी,गप्पा, मनोरंजनाचे बालपणीचे विविध खेळ  केले.काहींनी शाळेतील अनुभव कथन करत असताना एकदम शाळेचे दिवस समोर आले आणि आठवणींचा पट उलगडत गेला. विषय संपतासंपत नव्हते. कितीही गप्पा मारल्या तरी त्या कमीच वाटत होत्या.विशेष म्हणजे या सोहळ्यात त्या जुन्या आठवणीतील विविध खाद्य पदार्थाची व्यवस्था करण्यात आली होती त्याचा या मित्रांनी मनसोक्त आनंद लुटला.मंचाला बांधून ठेवण्यासाठी उत्कृष्ट असे संचालन मंगला चौधरी यांनी तर आभार सुनंदा खंडाळकर यांनी केले.राज्यभरातून वेळात वेळ काढून एकत्र आलेल्या या मित्र मैत्रिणी जेव्हा एकमेकांचा निरोप घेत होते तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी होते. यावेळी ही 'दोस्ती तुटायची नाय' म्हणत शपथ घेतली.हा क्षण येणाऱ्या पिढीला आदर्श देऊन गेला हे मात्र खरे आहे.

Comments