गवराळा येथील सामान्य नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर**महिलांवरील विनयभंगाच्या घटनांत वाढ**गणेश मंदिर परिसर बनलाय असामाजिक तत्वांचा अड्डा**आळा घालण्यास चुटकी बहुद्देशीय संस्थेची मागणी*
*महिलांवरील विनयभंगाच्या घटनांत वाढ*
*गणेश मंदिर परिसर बनलाय असामाजिक तत्वांचा अड्डा*
*आळा घालण्यास चुटकी बहुद्देशीय संस्थेची मागणी*
अतुल कोल्हे भद्रावती :-
एक काळ होता पोलिसांचे नुसते नाव जरी काढले तरी अंगावर काटा यायचा आणि खाकी दिसताच समाज कलंकित तत्वांना घाम फुटायचा. मात्र आजघडीला कायदा व सुव्यस्थेची धुरा सांभाळणाऱ्या पोलिसांची कर्तव्य प्रणाली बघितली तर सामान्य जनतेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
असेच काहीसे चित्र अवघ्या महाराष्ट्रात श्री गणेशाचे धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गवराळा येथील मंदिर परिसरात गेली अनेक वर्षांपासून दिसून येत असूनही स्थानिक पोलीस प्रशासनाने "डोळ्यावर पट्टी आणि कानावर हात" असी भूमिका कायम स्वीकारली आहे. यामुळे या परिसरात असामाजिक तत्वांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यांच्यावर कुणाचाही वचक नसल्याने एकीकडे त्यांच्या कडून होत असलेल्या अवैध गतीविधींमुळे सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण तर आहेच शिवाय हल्लीच्या काळात तर रस्त्यावरून ये जा करणाऱ्या आणि मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिलांच्या अब्रूचे धिंडवडे दिवसाढवळ्या काढल्या जात असल्याच्या तक्रारी पुढे यायला लागल्या आहे. या सर्व प्रकारास कारणीभूत येथील सर्रास सुरू असलेली अवैध दारू, गांजा विक्री, नशेडी तरुणांकडून कडून होणारी दुचाकीवरील स्टंटबाजी, प्रेमी युगुलांचे चव्हाट्यावरील अश्लील चाळे आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली टवाळखोरी असून यांचेवर कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी आता खुद्द स्थानिक चुटकी बहुद्देशीय विकास संस्था तसेच जय जगन्नाथ सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळा यांचे माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणुसमारे यांनी पुढाकार घेत या सर्व असामाजिक तत्वांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासन यांचेकडे निवेदनातून साकडे घातले आहे.
भद्रावती अंतर्गत येत असलेल्या गवराळा गावाला श्री गणेशाचे धार्मिक स्थळ म्हणून ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात.धार्मिक तिथींवर तर या ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी उसळते. या मंदिराचा लौकिक अवघ्या महाराष्ट्रभर आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात असामाजिक तत्वांचा वावर वाढला असल्याने येथील धर्मिकतेला बट्टा लागत असल्याचे भविकांकडून बोलले जात आहे. दर्शनासाठी येणाऱ्यामध्ये महिलावर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. याठिकाणी कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने नशेडी तरुण त्यांची छेड काढून विनयभंग करतात असे काही महिलांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखवले आहे. सायंकाळच्या सुमारास तर भद्रावती-गवराळा मार्गावरील मंदिराचे मुख्य द्वारावरच ही टवाळ मंडळी आपले ठिय्ये मांडून बसतात तर मंदिर परिसरात नशा करून सतत हुल्लडबाजी करीत असतात असे देखील सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात गांजा तसेच अवैध दारू विक्रीचे बाबतीत मोठे प्रकरण गाजले होते. यासाठी अनेक समाज हितचिंतकांनी तक्रारी देखील केल्या परंतु यावर कोणताही अंकुश लावण्यास पोलिसांनी हेतुपरस्पर दुर्लक्ष केले असा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलीस प्रशासन इतकी निगरगठ्ठ कसी काय असा प्रश्न यावेळी उपस्थित केल्या जात आहे. याचा विपरीत परिणाम म्हणजे
या परिसरात अनेक अवैद्य धंद्याने उच्छाद मांडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही टवाळ मंडळी आणि अवैध धंदेवाईक गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे कोणीही सामान्य नागरिक त्यांचा विरोध करीत नाही. त्यामुळे यावर आता कायम अंकुश लावण्यात यावा याकरिता पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेची बांधिलकी निभवावी नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी लिमेश माणुसणारे यांनी दिला आहे.
निवेदन देतांना जय जगन्नाथ सेवानिवृत्त मंडळाचे जेष्ठ सदस्य नीलकंठ आत्राम, पांडुरंग कोयचाडे, सूर्यभान परचाके, बंडू जी परचाके, महादेव डोंगे, अरुन येरकाडे, महादेव ऊरकुडे,प्रभाकर निमकर, तुळशीराम पोहनकर,
श्यामराव खापने, बबन जीवतोडे आदी उपस्थित होते.
भद्रावती येथील पोलीस निरीक्षक विपीन इंगळे हे न्यायप्रिय तसेच दबंग ठाणेदार म्हणून ख्यातिप्राप्त असल्याने त्यांच्याकडून सामान्य नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहे असे देखील माणुसमारे यांनी प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे सर्व जनतेचे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे.
*नशेड्यांमुळे गेला तिघांचा जीव*
भद्रावती-गवराळा मार्गावर नेहमीच नशेड्यांची मोटर सायकल वरून स्टंटबाजी सुरू राहत असल्यामुळे याच कारणाने गवराळा येथील खडसे कुटूंबातील पती पत्नी तसेच नुकताच ढोरवासा येथील मोरेश्वर घोडाम यांचा अपघातामध्ये बळी गेला.गवराळा येथील मोक्षधाम मध्ये तर नेहमीच गंजेटीचे वास्तव्य राहत असल्याच्या काही नागरिकांच्या तक्रारी आहे. यांचेवर तात्काळ कारवाई न केल्यास आणखी किती लोकांचा बळी जाईल याची शास्वती नाही.
*अवैध गतीविधीला कुणाची पाठराखण*
गेली अनेक वर्षांपासून परिसरात सुरू असलेल्या या अवैध गतीविधींवर कुणाचाही वचक नाही.अनेकदा तक्रारी करूनही यावर अंकुश लावण्यास पोलिसांना यश मिळाले नाही.मग समाज कलंकित करणाऱ्या या असामाजिक तत्वांना नेमकी कुणाची पाठराखण होत आहे? यात पोलीस हेतुपरस्पर तर दुर्लक्ष करीत नाही ना? असा सवाल पीडित नागरिकांनी उपस्थित केला आहे.
Comments
Post a Comment