*बंद तेलवासा कोळसा खणीतील घटना*
अतुल कोल्हे भद्रावती.
तालुक्यातील तेलवासा येथील बंद असलेल्या कोळसा खाणीतून विक्रीसाठी कोळसा काढत असताना ढिगार्याखाली दबून एका चाळीस वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रवींद्र पाटील वय 40 वर्षे, राहणार पिपरी देशमुख असे या मृतक इसमाचे नाव आहे. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून मोठ्या प्रयत्नाने मृतकाचा ढिगाऱ्याखाली दबलेला मृतदेह बाहेर काढला. आवश्यक ती कार्यवाई केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
सदर कोळसाखान बंद असून या खाणीतून अनेक बेरोजगार कोळसा काढून त्याची बाजारात विक्री करतात. रवींद्र पाटील हा सुद्धा येथील कोळसा खाणीतून कोळसा काढून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करीत होता. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे तो खाणीत कोळसा काढण्यासाठी गेला होता. भुयारवजा पोकळीत शिरून कोळसा काढत असताना अचानक मातीचा ढिगारा त्याच्या अंगावर कोसळला, त्यात दबून त्याचा मृत्यू झाला. या खाणीत कोळसा काढण्यासाठी अनेक बेरोजगार जात असतात त्यामुळे भविष्यातही अशा घटना घडू शकतात. अशा घटना घडू नये यासाठी वेकोलीने या खाणीतील पोकळ्या बंद कराव्या अशी मागणीतील तेलवासा ग्रामपंचायतीचे सरपंच आकाश जुनघरे, ग्रामपंचायत सदस्य नितीन नगराळे, अनिता बोबडे, व पोलीस पाटील सपना नगराळे यांनी केली आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व म्हातारी आई असा आप्त परिवार आहे.
Comments
Post a Comment