वरोरा
आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा “कृषीगंध -२०२४” दि. १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान उत्साहात साजरा झाला. ‘कृषीगंध: द इसेन्स ऑफ लाइफ’ या धर्तीवर साजरा करण्यात आलेल्या या पाच दिवसीय सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने त्यांना वेगवेगळ्या क्रीडा-स्पर्धांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर पारितोषिक वितरणाचे आयोजन देखील करण्यात आले होते. दि. १८ व १९ रोजी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणाच्या प्रसंगी दि. २० रोजी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कुसलकर, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, चंद्रपूर हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी कृषी विभाग आणि त्यामध्ये चालणारी कार्यप्रणाली यावर सविस्तर माहिती सांगितली, त्याबरोबरच स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून कृषी विभागात सेवेची संधी यावर माहिती दिली. यावेळी डॉ. सुहास पोतदार, प्राचार्य अनिकृम वरोरा यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक वाटचालीचे विवेचन मांडले तसेच गतवर्षातल्या स्पर्धापरीक्षेत व विद्यापीठ स्तरावरील विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. वेगवेगळ्या मैदानी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दुपारी विद्यार्थी- शिक्षकजणांसाठी प्रीतीभोजनाच्या आयोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या पाच दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment