वरोऱ्यात मिठाईच्या दराने विकले जात आहे खरड्याचे डबे*वैधमापन विभागाचे दुर्लक्ष

वरोऱ्यात मिठाईच्या दराने विकले जात आहे खरड्याचे डबे
*वैधमापन विभागाचे दुर्लक्ष

अनिल पाटील 
वरोरा 

वरोरा : कोणत्या वस्तूला केंव्हा कोणती किंमत येईल हे सांगता येत नसले तरी ग्राहकांना बनवून कोणती वस्तू कोणत्या दराने विकायची याची किमया व्यवसायिकांना चांगलीच  ठाऊक असते असे म्हणायला हरकत नाही. याचा प्रत्यय वरोरा येथे येत असून शहरातील काही मिठाई विक्रेते चक्क मिठाईच्या दरात खरड्याचे डब्बे विकत आहे. परंतु वैधमापन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
वरोरा शहर आणि परिसरात अनेक मिठाईची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये सहाशे रुपये प्रति किलो दरापासून तर एक हजार रुपये प्रति किलो दरापर्यंत मिठाई विक्रीला आहे. ग्राहक जेव्हा अशी मिठाई विकत घेण्यासाठी जातात, तेव्हा दुकानदाराने वजन काट्यावर मिठाई ठेवून तिचे वजन केल्यानंतर ती खरड्याच्या डब्यात भरणे अनिवार्य असते. परंतु अनेक दुकानदार तसे न करता चक्क खर्ड्याचा  डब्बाच वजन काट्यावर ठेवतात आणि त्यात मिठाई भरून मागितलेल्या वजना एवढे मिठाईचे डब्यासह वजन मोजून ती ग्राहकाला देतात. खर्ड्याच्या डब्यांचे वजन गृहीत धरले जात नसल्याने अतिशय अल्प दरात मिळणारे खर्ड्याचे डबेच मिठाच्या दराने विकले जात आहे हे स्पष्ट आहे. मिठाई दुकानदार अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करत असताना वैधमापन विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

 
भाजीविक्रेत्यांची वजने तपासण्याची गरज

वरोरा शहरात दररोज भाजी बाजार भरत असतो. यातही रविवारी मुख्य बाजारपेठेत व आनंदवन चौकामध्ये भरणारा बाजार आणि बुधवार रोजी आनंदवन चौकामध्ये भरणारा भाजी बाजार हा ग्राहकांसाठी महत्त्वाचा असतो. या  भाजी बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. याचा गैरफायदा घेऊन भाजीविक्रेते ग्राहकांना वजनाच्या तुलनेत कमी भाजीपाला देत असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे असलेली वजने ही प्रमाणित नसून अप्रमाणित वजनाच्या माध्यमातून ते ग्राहकांची फसवणूक करीत आहे. डिजिटल वजना द्वारे सुद्धा ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. यामुळे याची दखल वैधमापन विभागाने घेण्याची गरज आहे.

Comments