*भिम आर्मीचे " बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर "धरणे आंदोलन*
*अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडणार बस्थान*
*पत्रकारांनी समस्या जाणून घेतल्या*
वरोडा : श्याम ठेंगडी
वरोडा तालुक्यातील शेवटचे टोक असलेला पाजरेपार रीठ ते आबमक्ता व मौजा पाजरेपार रीठ ते गिरोला या रस्त्यासाठी या गावातील नागरिक गेल्या २५ वर्षांपासून सतत मागणी करत आहेत.परंतु प्रशासनाने अजूनपावेतो कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.नागरिकांच्या या मागणीकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करत आहे.रस्त्याच्या या मागणीसाठी तालुका भीम आर्मी संविधान रक्षक दलाने पुढाकार घेतला असून त्यांच्या पुढाकाराने पाजरेपार येथील शिवबंधाऱ्याजवळ " बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" हे अनोखे धरणे आंदोलन सुरू आहे. हे धरणे दिवसभर तसेच थंडीत रात्रीही केले जात आहे विशेष.
भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या तालुका संघटनेने पुढाकार घेत पाठपुरावा करत रस्त्याची मागणी लावून धरली आहे. या गावातील काही भाग चिमूर विधानसभा तर काही भाग वरोडा भद्रावती विधानसभा अशा दोन क्षेत्रात विभागला गेला आहे. ग्रामस्थांनी या दोन्ही क्षेत्रातील तहसीलदार , उपविभागीय अधिकारी , गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अभियंता , तसेच जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी , मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी , वरोडा -भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार यांना निवेदन सादर केले. परंतु अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
माकोणा येथील रहिवासी असलेल्या रहिवाशांची पाजरेपार रीट येथे शेती आहे. शेतीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात चिखलमय रस्त्याने जावे लागते. ऐवढेच नाहीतर नागरिकांना कपडे काढून नाला पार करावा लागतो. तरी प्रशासन दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहे. म्हणून रस्त्याची मागणी पुर्ण करावी यासाठी भिम आर्मी संविधान रक्षक दल वरोडा तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन उभारण्यात आले.
या धरणे आंदोलनात आबमक्ता, गिरोला, येरखेडा, माकोणा, पाजरेपार रीठ या गावाच्या शेतकऱ्यांसोबत महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत. या नाल्यामुळे नाल्याच्या अलीकडील भाग चिमूर क्षेत्रात तर पलीकडील भाग वरोडा भद्रावती विधानसभा क्षेत्रात येतो. दोन क्षेत्रात विभागलेल्या या प्रश्नाची उकल कोणत्याही विभागाने गेल्या अनेक वर्षापासून केलेली नाही. त्यामुळे हा भाग दुर्लक्षित आहे.
पावसाळा संपून दीड महिन्याचा कालावधी लोटला असतानाही अजूनही रस्ता चिखलमय असल्याचे या भागाला भेट दिलेल्या पत्रकारांना दिसून आले.
प्राप्त माहितीनुसार पाजरेपार रीट-गिरोला या रस्त्यासाठी चिमूरचे आमदार बंटी भाई भांगडिया यांनी दोन कोटी रुपये मंजूर केल्याची वृत्त आहे.
परंतु पाजरेपार रीट ते आसमत्ता या रस्त्याचे काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे. चिमूर व वरोडा या दोन्ही तालुक्यातील बांधकाम विभाग संबंधित रस्ता आपल्या क्षेत्रात येत नसल्याचे सांगत असल्याची माहिती धरणग्रस्त आंदोलकांनी पत्रकारांनी दिली.
रस्त्याला येत्या सात दिवसांत मंजुरी देण्यात आली नाहीतर गिरोला, आबमक्ता, येरखेडा, माकोणा, पाजरेपार रीठ येथील शेतकरी शेती करणे व घरदार सोडून चंद्रपूर येथे जाऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बस्थान मांडणार असून तेथेच संसार थाटतील असा इशारा या पाच गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे. या ठिय्या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची जिवित वा अन्य कोणतेही हानी झाल्यास जिल्हाधिकारी यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणार असून येणाऱ्या आगामी निवडणुकीवर बहिष्कार करण्यात येणार असा इशारा आंदोलनातन भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम व शेतकऱ्यांनी दिला.
त्यामुळे तात्काळ या रस्त्याला मंजुरी देण्यात यावी आणि बांधकामास सुरुवात करावी अशी मागणी भिम आर्मी संविधान रक्षक दल वरोडा तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी मागणी केली आहे.
Comments
Post a Comment