वरोडा येथील 27 वर्षीय युवकाने घेतली जैन धर्माची दीक्षा* *संस्कार नसतील तर समाज दिशाहीन होईल: प्रयास* *जैन धर्माच्या जिओ और जीने दो या शिकवणीमुळे प्रभावित झालो : प्रयास*

*वरोडा येथील 27 वर्षीय युवकाने घेतली जैन धर्माची दीक्षा*

 *संस्कार नसतील तर समाज दिशाहीन होईल: प्रयास*

 *जैन धर्माच्या जिओ और जीने दो या शिकवणीमुळे प्रभावित झालो : प्रयास*

 वरोडा : श्याम ठेंगडी 
         येथील एका सुखवस्तू व श्रीमंत घराण्यात जन्माला आलेल्या उच्चविद्या विभूषित 27 वर्षीय युवकाने *"अहिंसा परमो धर्म: "* आणि  *" जिओ और जीने दो "* ही शिकवण देणाऱ्या जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे समाजात उत्साह व आनंदाचे वातावरण आहे.
         येथील प्रतिष्ठित कापड व्यापारी व प्लॉट व्यवसायिक अजय मालू यांचा एकुलता एक मुलगा प्रयास याने जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे . प्रयासचा हा निर्णय पाहून जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय आणखीन 14 जणांनी घेतला आहे.या चौदा जणात तीन मुले व 11 मुलींचा समावेश असून एक जण वगळता बाकीचे सर्व प्रयासच्या वयापेक्षा लहान आहेत हे विशेष.
              तारुण्यात भावी आयुष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या युवकांच्या विचारांच्या विपरीत निर्णय घेणाऱ्या प्रयासच्या या धाडसी निर्णयाबाबत जाणून घेण्यासाठी त्याच्याशी  बातचीत केली व त्याची मते आमच्या प्रतिनिधीने जाणून घेतली. 
     जीवनात काहीतरी कमी आहे.याची जाणीव मला 2018 मध्ये झाली. गुरुची साथ हा जीवनाचा उद्देश आहे. जैन धर्मात ते पूर्ण होतील.जीवनात जे रिकामे पण आहे, ते पूर्णत्वास जाईल असे वाटल्याने आपण जैन धर्माची दीक्षा घेत असल्याचे त्याने सांगितले.
     प्रयास हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले   आहे.जबलपूर येथे पाचवीपर्यंत चे शिक्षण घेतल्यानंतर त्याने वरोडा येथील संस्कार भारती विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नागपूर येथील यशवंतराव चव्हाण कॉलेजमधून त्याने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. 
       इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असताना कोणताही धर्म आऊटडेटेड नाही.तर प्रत्येक धर्म जीवन कसे जगायचे हे शिकवतो. आपण धर्म सोडला,तर संस्कार जातील आणि संस्कार नसतील तर समाज दिशाहीन होईल. याचे महत्त्व आपणास पटले आणि जिओ और जीने दो ची शिकवण देणा-या विचारावर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली. अहिंसा, सत्य बोलणे, मालमत्तेचा लोभ न करणे, चोरी न करणे व भोगवादी न होणे या पाच महावृत्तातून जैन धर्माची शिकवण स्पष्ट होते. म्हणूनच चौवीस तीर्थकारांची परंपरा लाभलेल्या जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे  प्रयासने सांगितले. 
          जैन धर्माचे विचार आपल्या मनात पाच वर्षापासून सुरू असून जैन धर्माच्या चालीरीतीप्रमाणे आचरण करत स्वतःच्या आत्म्याचे कल्याण करता करता विश्वातील सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करणे. यासोबतच धर्माचा ही प्रचार करणे.हेच आपले लक्ष असल्याचे प्रयास याने एका प्रश्नाबाबत स्पष्ट केले.
      साधू जीवन कष्टदायक आहे असे सर्वांना वाटते. पण ते सुखदायक आहे.ते कष्ट दायक वाटत नाही. आत्म्यापर्यंत पोहोचायचे असेल तर शरीराला कष्ट करावेच लागतात. हे अध्यात्मही प्रयास सांगून गेला.
            छत्तीसगड मधील खरतरगच्छाचार्य परम पूजनीय श्री जिन पियुषसागरजी सुरीश्वरजी म सा यांच्या आशीर्वादाने होणारा हा दीक्षा समारोह वरोडा येथे 14 नोव्हेंबर पासून सुरू झाला असून 18 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. मुख्य दीक्षा समारोह गुजरात मधील भावनगर जिल्ह्यातील पालीताना येथील सुनत्तर भवनात सात डिसेंबरला होणार आहे.
      आज 16 नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता मालू यांच्या निवासस्थानापासून प्रयास यांची भव्य रथयात्रा काढण्यात आली . यानंतर बैठा वर्षीदान, सन्मान समारोह, स्वधर्म वासल्य, उपकार वंदनावली झाल्यानंतर बिदाई समारोह संपन्न झाला. यावेळी काही काळासाठी वातावरण गंभीर झाले होते. 
*प्रयास समाजाचे कल्याण करेल: आई*
आपल्या एकुलत्या एका मुलाने जैन धर्माची दीक्षा घेण्याचा घेतलेल्या निर्णयाशी आपण सुरुवातीला सहमत नव्हतो. परंतु ज्यांना एकही अपत्य नाही, ते जगतातच ना आणि आपला मुलगा तर धर्म कार्यासाठी जात आहे.हे आपणास पटले. ज्यात प्रयासला खुशी आहे,त्यातच तो खुश राहील याची जाणीव झाल्याने आपणास आनंद झाला व त्याच्या निर्णयाला आपण सहमती दिल्याचे प्रयासची आई जया मालू यांनी सांगत आपला प्रयास  संस्कारी मार्गावर जात आहे आणि हा मार्गक्रमण करत असताना स्वतः सोबत समाजातील अनेकांचे कल्याण करेल. त्यांना चांगला मार्ग दाखवेल असा विश्वास प्रयासची आई यांनी व्यक्त केला.
*प्रयासच्या निर्णयाचा आनंदच:वडील*
लहानपणी आपणासही जैन धर्माची ओढ होती. पण आपणास गुरु न मिळाल्याने ज्या मार्गावर मुलगा जात आहे. त्या मार्गावर आपण जाऊ शकलो नाही, याचे दु:ख नाही असे सांगत प्रयासच्या निर्णयामुळे आपणास आनंद झाला असल्याचे त्याचे वडील अजय मालू यांनी स्पष्ट केले आणि ज्या तिथीला भगवान महावीरांनी जैन धर्माची दीक्षा घेतली. त्याच तिथीला आपला मुलगाही जैन धर्माची दीक्षा घेत आहे अशी माहिती दिली.
      प्रयास सारख्या तरुण मुलाने जैन धर्माची दीक्षा घेऊन इतर तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला असून धर्माप्रती असलेली आपली निष्ठा व्यक्त केली आहे.

Comments