शेतकऱ्यांनी सध्या शेती विकू नये.
वरोरा
(अनिल पाटिल)
वरोरा (चंद्रपूर): जिल्ह्यात सोने व तांब्याच्या खनिजांचे साठे असल्याचे उघड झाल्यानंतर वरोरा तालुक्यातील सुमठाणा-लोणार परिसरात खनिज तेलाचा साठा असल्याची चर्चा होती. सदर परिसरात दि १० जानेवारी २०२३ रोजी एका विमानाने अतिशय कमी उंचीवरून उड्डाण घेऊन दहा घिरट्या मारल्या होत्या. तीन वर्षांपूर्वी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन हैदराबादच्या पथकाने संशोधन केल्या सदर भागात विमानाच्या घिरट्या आणि नंतर दि ५ व ७ फेब्रुवारी रोजी कॅमेरा लावलेल्या चारचाकी वाहनाने फेऱ्या मारल्या होत्या.परिणामी या भागात खनिज संपत्ती दडली असल्याच्या वृत्ताला पुन्हा एकदा दुजोरा आणि बळकटी मिळाली होती. या संदर्भातील वृत्त दैनिक पुण्यनगरीमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रकाशित झाले होते. दरम्यान अलीकडेच आलेल्या वृत्तानुसार सुमठाणा परिसरासह चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य काही भागात मिथेन वायूचा साठा असल्याचे निष्पन्न झाले असून ओएनजीसी कंपनी हे ब्लॉक घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वरोरा तालुक्यातील सुमठाणा मंदिर परिसरातील बोरवेल मधील पाण्याला खनिज तेलाचा गंध येत आसल्याचा अनुभव ग्रामस्थांना आला होता. ही माहिती प्रशासनापर्यंत पोहोचली आणि प्रशासनाने ती बोअरवेल बुजवून टाकली.हा विषय येथेच संपला असे ग्रामस्थांना वाटत होते. परंतु काही वर्षानंतर हैदराबाद येथील ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशनच्या पथकाने या परिसरात संशोधन सुरू केले. तीन वर्षांपूर्वी सुमारे ५० ते ६० बोअर मारणाऱ्या वाहनांचा वापर करून ११६४४ ठिकाणी खड्डे करून भूगर्भातील खनिज संपत्तीचा शोध घेतला गेला . या संशोधना याबाबत ग्रामस्थांनी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु शोध पथकाकडून अत्यंत गोपनीयता बाळगली गेल्याने ग्रामस्थ माहिती मिळविण्यात अपयशी ठरले होते.
बोअर मारून त्यात सेन्सर सारखे उपकरण सोडून माहिती गोळा केली जायची व ती हैदराबाद येथील केंद्रात पाठविली जायची असे म्हटले जाते. परंतु सुमठाणा मंदिर परिसरातील बोअरवेल मधील पाण्याला खनिज तेलाचा गंध असल्याचे उघड होणे आणि त्यानंतर ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन हैदराबाद कडून सर्वे होणे यावरून तो खनिज तेलासंदर्भातीलच सर्वे होता असा विश्वास ग्रामस्थांचा होता. दरम्यान मागील तीन वर्ष यावर काहीही झाले नव्हते. आणि मंगळवार दि.१० जानेवारी रोजी एका विमानाने जमिनीपासून अतिशय कमी उंचीवरून उड्डाण करीत सुमारे दहा वेळा त्याच परिसरात धिरट्या मारल्या. यामुळे ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन हैदराबादच्या संशोधन पथकाने घेतलेल्या शोधानुसार या परिसरात खनिज तेल असण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.त्यातच ५ व ७ फेब्रुवारी २०२३रोजी कॅमेरा लावून असलेल्या चारचाकी वाहनाने कोठा, लोणार,सुमठाणा,वरार,
गिरोला,आल्फर,मोखाळा भागात फेऱ्या मारल्या होत्या. ग्रामस्थांनी वाहनातील व्यक्तींकडून या संदर्भात माहिती घेतली असता रस्त्यांचा सर्व्हे होत असल्याचे सांगितले गेले.परंतु सदर वाहन गावातील गल्ली पर्यंत तसेच वस्ती नसलेल्या जुन्या सुमठाणा गाव परिसरात फिरल्याने वाहनातील व्यक्ती योग्य माहिती देत असल्याचा संशय ग्रामस्थांना होता.आणि हा सर्व्हे सुमठाणा-लोणार परिसरातील भूगर्भात दडलेल्या खनिज संपत्तीच्या संदर्भात असावा असा विश्वास ग्रामस्थांना होता. त्यांचा हा संशय आज खरा खरा ठरला असल्याचे दिसून येत आहे. सदर भागासह चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य काही भागात मोठ्या प्रमाणात मिथेन वायू असल्याचे निष्पन्न झाले असून या वायूचे ब्लॉक निविदा काढून कंपन्यांना देण्याची कार्यवाही शासनाने सुरू केली आहे. वरोरा परिसरातील हा ब्लॉक ओएनजीसी कंपनीत घेणार असल्याचे म्हटले जाते. यामुळे रोजगाराची नवी संधी चालून येणार असल्याने सदर परिसरातील ग्रामस्थांचे भाग्य उजळणार असा विश्वास ग्रामस्थांना आहे.
Comments
Post a Comment