निवडणूकीला वेळ,मात्र**इच्छुक लागले कामाला*

         *विधानसभा वार्तापत्र*
          *श्याम ठेंगडी , वरोडा *

*निवडणूकीला वेळ,मात्र*
*इच्छुक लागले कामाला*

     महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीला जवळपास एक वर्षाचा कालावधी असताना मात्र वरोडा भद्रावती विधानसभा क्षेत्रात विविध पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी आपली व्युहरचना करण्यास सुरुवात केली आहे.आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट,काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार यांची महाविकास आघाडी एकजूट राहिल्यास या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजप समर्थित आघाडी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
    महाविकास आघाडीत या विधानसभा जागेबाबत तडजोड होईल प्राप्त परिस्थितीवरून दिसत आहे.परंतू  या क्षेत्रात काँग्रेसचे विद्यमान उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचे प्राबल्य असून यापूर्वी या क्षेत्रातून शिवसेनेने ही जागा आपल्या ताब्यात घेतली होती. त्यामुळे काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट हे दोन्ही महाविकास आघाडीतील पक्ष या जागेवर दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातून प्रत्येक पक्षातील एक ते दोन इच्छुक उमेदवार आपणास उमेदवारी मिळेल या आशेने कामाला लागलेले असले तरी पक्ष ज्या कोणास उमेदवारी देईल त्याच्या मागे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने उभे राहतीलच असे मत व्यक्त करणे कठीण आहे. पक्षाच्या उमेदवारीवर एकमत झाल्यास त्या पक्षाचा उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारासमोर आव्हान निर्माण करेल व असे झाल्यास तो विजयी होऊ शकेल यात शंका नाही.

          तसे पाहिल्यास हे विधानसभा क्षेत्र काँग्रेस पक्षाचा गड समजल्या जाते. या क्षेत्रात दादासाहेब देवतळे यांची कृपादृष्टी होती. या क्षेत्रात बलाढ्य असलेला काँग्रेस पक्ष कार्यकर्ते यामधील नाराजी व बंडखोरी मुळे कमकुवत होत गेला.कमकुवत व दिशाहीन झालेल्या या पक्षात मात्र मागील लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय बाळासाहेब धानोरकर यांनी खासदार म्हणून निवडून येऊन आपल्या पक्षाला नवसंजीवनी दिली. 
     विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर या विधानसभेसाठी काँग्रेसच्या प्रभावी उमेदवार ठरू शकतात. परंतु नुकत्याच चंद्रपूर येथे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी आलेल्या काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकांनी प्रतिभाताई धानोरकर यांच्या नावाची शिफारस चंद्रपूर- आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी संभाव्य उमेदवार म्हणून हायकमांडकडे केली असल्याची माहिती आहे.जर त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली तर या मतदारसंघातून विधानसभेसाठी येथील ख्यातनामक डॉक्टर व  विजय वडेट्टीवार यांचे खंदेसमर्थक डॉक्टर हेमंत खापणे किंवा भद्रावतीचे नगराध्यक्ष स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांचे नाव समोर येऊ शकते.अनिल धानोरकर व डॉक्टर हेमंत खापणे या दोघांचाही जनसंपर्क दांडगा असला तरी डॉक्टर हेमंत खापणे यांनी कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून केलेले कार्य ही त्यांची जमेची बाजू समजली जात आहे. हे दोघेही सर्व परिचित असल्यामुळे ते प्रभावी ठरू शकतात.
      भाजपा व शिवसेना युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला नेहमीच गेला त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या मागे आपली ताकद उभी करावी लागत होती. मात्र यावेळेस चित्र स्पष्ट झालेले नाही. जर शिंदे समर्थित शिवसेना व भाजप यांनी संयुक्तपणे ही निवडणूक लढल्यास प्रतिस्पर्धी उमेदवारासमोर कडवे आव्हान निर्माण करू शकतात. मात्र हा मतदारसंघ कोणाच्या पारड्यात जातो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
  सध्या या मतदारसंघात भाजपात अनेक बलवान उमेदवार  बाशिंग बांधून तयार आहेत. या मतदारसंघात संजय देवतळे यांचे पुत्र करण देवतळे व वरोड्याचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली , सागर वझे, रमेश राजुरकर , राजू गायकवाड, भगवान गायकवाड, अशी बरीच मातब्बर उमेदवार म्हणून आपले भाग्य आजमावण्याची शक्यता आहे. करण देवतळे यांच्या मागे राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय संजय देवतळे यांची पुण्याई  तर नगराध्यक्ष असताना  शहराचा विकासासाठी झटणारे विकासपुरुष म्हणून अहेतेश्याम अली यांची ओळख ही महत्त्वाची आहे. बाकी जुने कार्यकर्ते असल्याने एकनिष्ठ असल्याचे बळ त्यांच्याकडे आहे.

तर नवीनच एन्ट्री टाकलेले डॉक्टर सागर वझे यांचे सामाजिक कार्य व भाजपा कार्यकर्त्यांसाठी केलेली मदत पाहून हायकमान खुश आहे.


 भाजपमध्ये नव्यानेच आलेले रमेश राजूरकर यांनी मागील वेळी मनसेतर्फे निवडणूक लढविली होती व 32000 मते घेऊन आपली छाप ठेवली आहे.रमेश राजूरकर यांचेवर भाजप पक्षाने वरोडा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या प्रमुखाची जबाबदारी दिलेली आहे. 

           भद्रावती येथील भाजपचे कट्टर समर्थक असलेल्या गुंडावार परिवारही विधानसभेच्या  उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. या या क्षेत्रातील एक प्रभावी व सामाजिक कार्यकर्ते भद्रावतीचेच किशोर टोंगे हेही विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असून ते भाजपात प्रवेश करून पक्षातर्फे उमेदवारी मागणार असल्याचे संकेत आहेत.
          मागील 2014 च्या निवडणुकीत विधानसभेसाठी भाजपची उमेदवारी मिळून ऐनवेळी उमेदवारी नाकारली गेलेले ओम मांडवकर हे सुद्धा यावेळेस भाजपतर्फे रिंगणात येण्याची शक्यता आहे. उमेदवारी नाकारली गेलेली असतानाही त्यांनी सतत दहा वर्षे पक्षासाठी निष्ठेने केलेले कार्य ही त्यांची जमेची बाजू समजली जात आहे. मात्र असे झाल्यास उमेदवारीसाठी भाजपला मोठी कसरत करावी लागेल हे मात्र नक्की. 

        भाजप - शिंदे गट एकत्र न आल्यास शिंदे गटातर्फे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते हे उमेदवारीचे दावेदार ठरू शकतात.परंतु  शिवसेनेचा शिंदे गट या मतदार संघात आपला प्रभाव निर्माण करू शकलेला नाही.त्यामुळे मत्ते हे हाडाचे कार्यकर्ते असले तरी ते कितपत प्रभावी ठरतील हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
     राष्ट्रवादी  काँग्रेस ची या मतदारसंघात म्हणावी तशी स्थिती नसल्याने व सध्या पक्षातर्फे असा प्रभावी नेता समोर दिसत नसल्याने राष्ट्रवादीकडून दादागट कोण लढू शकेल हे सांगणे कठीण आहे. परंतु अमोल बावणे यांचा विचार सुरू आहे. पक्षातर्फे बाहेरील पार्सल येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

      शिवसेना ठाकरे गटाची परिस्थिती मात्र आज अनुकूल दिसत आहे. या पक्षाचे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे हे दोघेही आपल्या पक्षासाठी जोमाने कामाला लागलेले आहेत. अशा स्थितीत दोघांची दावेदारी  प्रबल समजली जात आहे. या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणे हे कर्मप्राप्त आहे. मात्र या दोघांत असलेले विळ्या भोपळ्याचे सख्य पाहता अशा स्थितीत दुसरा त्यास कितपत सहकार्य करतो. यावर सर्व काही अवलंबून आहे.
           याशिवाय या क्षेत्रात रिपब्लिकन पक्षाचे रायपुरे, गोंडवाना गणतंत्र पार्टी तर्फे रमेश मेश्राम,विविध गटाचे उमेदवार ही रिंगणात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परंतु वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील राजकीय वर्तुळात पोकळी निर्माण झाली असली तरी नवीन नेतृत्व जोमाने कामाला लागले असून येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की त्यांचा प्रभाव दिसून येणार आहे. वरील सर्व बाबींचा अभ्यास या सर्व राजकारणांना असून त्याप्रमाणे विरोधी गटात आपले प्यादे प्लांट केलेले सुद्धा काही ठिकाणी दिसून येतात.
 याचा वापर निवडणुकीच्या वेळेस केल्या जातो. हे स्लीपर सेल्स नेमके त्याच वेळी जागे होतात आणि राजकीय गणिते बिघडवीत असतात. त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची भरती सुरू आहे. मात्र याच कार्यकर्त्यांमध्ये आमचा खरा नेता कोण याचा शोध कार्यकर्ते घेत आहे.
..............Comments