*संस्कारीत युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन*
*शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १००कोटीचा प्रस्ताव*
वरोडा : श्याम ठेंगडी, वरोरा
सध्या समाजात कटूता निर्माण करण्यासाठी जाती-जातीत विष पेरण्याची ओढ लागली आहे. जो जास्त शिकतो तो जास्त विष ओकत आहे.अशी विषारी विचारधारा संपवावी लागेल.ही विषारी विचारधारा संपवण्यासाठी संस्कारित शिक्षण हेच औषध आहे. म्हणून असे संस्कारित शिक्षण या वाचनालयातून व्हावे अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी २५ आॅगस्ट रोज शुक्रवारला वरोडा येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले.
शहरात प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत नगर परिषदेतर्फे बांधण्यात आलेल्या श्रद्धेय अटलबिहारी बाजपेयी अभ्यासिकेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर, नगर परिषदेचे माजी अध्यक्ष अय ते श्याम आली, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,रमेश राजूरकर यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते.
या वाचनालयाचा लोकार्पण सोहळा येथील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता.तसेच यास आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले व आमदार रामदास आंबटकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते. पण या नियोजित पाहुण्या पैकी एकही आमदार लोकार्पण सोहळ्याला उपस्थित नव्हते.त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा मात्र यावेळेस रंगली होती.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो तसेच हम साथ,साथ है ही भावना निर्माण करून स्वैराचारी नव्हे, तर संस्कारीत माणूस घडविणारे शिक्षण या वाचनालयातून युवकांनी आत्मसात करावे. नोकरी घेणारे नव्हे तर नोकरी देणारे युवक तयार झाल्यास आपणास आनंद होईल असे उद्गारही त्यांनी याप्रसंगी काढले.
जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे शहरात आगमन होताच त्यांनी सर्वप्रथम अभ्यंकर वार्डातील रमेश राजूरकर यांच्या जनसंपर्क कार्यालय व भाजपच्या वाररूमचे य अर्धाकृती पुतळयाला तर सावरकर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर संस्कार भारती विद्यालयाच्या बँड पथकाद्वारे त्यांना वाजत गाजत कार्यक्रम स्थळी आणण्यात आले.
*जि.प.शाळेतील शिक्षणात सुधारणा करणार!*
दरवर्षी शासन जिल्हा परिषदेच्या शिक्षणावर 80 हजार कोटी रुपये खर्च करीत असतांना मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणाची आजची अवस्था अत्यंत भयावह असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, या शाळेत सुधारणा करून त्यासमोर कशा येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा शाळेतून उत्तम विद्यार्थी घडवून तो पुढे उत्तम माणूस म्हणून देशाची सेवा करण्यास समर्थ होईल असे वातावरण तयार करण्याची गरज असल्याचे म्हणाले.
*पाणी पुरवठा योजनेसाठी प्रयत्न करणार: मुनगंटीवार*
वरोडा शहराच्या पुढील 40 वर्षाची संभाव्य लोकसंख्या लक्षात घेता शहराला पाणीपुरवठा करणारी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच मंत्रालयात जनसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत आपण या योजनेसाठी 100 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आणि ही योजना मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्टा करू असे अभिवचन या कार्यक्रमात बोलताना नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी उपस्थित शहरवासीयांना दिले.
मंत्री महोदयाचे कार्यक्रम स्थळी आगमन होतांच सर्वप्रथम सुवासिनींनी त्यांचे औक्षवण केल्यानंतर मंत्री महोदयांनी फित कापून व फलकाचे अनावरण करून अभ्यासिकेचे लोकार्पण केले.मंत्री महोदयांनी अभ्यासिकेची पाहणी करून झालेल्या कार्या व उपलब्ध सोयीबद्दल समाधान व्यक्त केले.यानंतर दीप ज्वलित करून लोकार्पण सोहळ्याला सुरुवात झाली. या लोकार्पण सोहळ्यात उपस्थितांना पंचप्राण शपथ देण्यात आली .
या ई वाचनालयाच्या मंजुरी पासून निधी आणण्यापर्यंतच्या प्रक्रियेसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणाऱ्या विद्यमान नगराध्यक्षांचे नाव लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत नसल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेत कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या असलेल्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या हे विशेष.
सुरुवातीला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक गजानन भोयर यांनी आपल्या प्रास्ताविकात ही इमारत एक वास्तू नसून जीवनाची चढणघडण करणारे स्थान असल्याचे सांगत इमारतीत उपलब्ध सर्व सोयीची माहिती दिली.
हे ई वाचनालय शहरातील व ग्रामीण भागातील युवकांच्या स्वप्नपूर्तीचे स्थान ठरेल असे सांगत माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी,आपण नगराध्यक्ष असतांना शहराच्या विकासासाठी तत्कालीन अर्थमंत्री व पालकमंत्री असलेल्या सुधीर भाऊंनी शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी दिल्याचे सांगत नगरपरिषदेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मात्र त्यांच्या हस्ते होऊ शकले नाही अशी खंत व्यक्त करत आगामी काळात त्या इमारतीचे उद्घाटन सुधीरभाऊंच्या हस्ते केले जाईल असे ग्वाही याप्रसंगी दिली.
प्रशांत खुळे यांनी कार्यक्रमाचे संचलन तर अभिजीत मोटघरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शहरातील गणमान्य व्यक्ती व नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.
स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबतर्फे यावेळी मंत्री महोदयांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर वरोडा जिल्हा व्हावा या मागणीसाठी जिल्हा संघर्ष समितीतर्फे तसेच प्रवासी संघर्ष समितीतर्फे वरोडा रेल्वे स्थानकावर विविध सोयी व गाड्यांचा थांबा देण्यात यावा या मागण्यांचे निवेदन मंत्री महोदयांना देण्यात आले.
.............
Comments
Post a Comment