शासकीय तांदूळ तस्करी प्रकरणात बाजार समितीची माहिती देण्यास टाळाटाळ * तीन विद्यमान संचालकांच्या आरोपांनी खळबळ* मुख्य आरोपी अजूनही फरार

शासकीय तांदूळ तस्करी प्रकरणात बाजार समितीची माहिती देण्यास टाळाटाळ 
 * तीन विद्यमान संचालकांच्या आरोपांनी खळबळ
* मुख्य आरोपी अजूनही फरार
वरोरा (चंद्रपूर): तालुक्यातील शेगाव (बु) पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या शासकीय तांदूळ तस्करी प्रकरणात माजी सभापती तथा विद्यमान संचालक राजेंद्र चिकटे , शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) तथा विद्यमान संचालक नितीन मत्ते, विद्यमान संचालक पुरुषोत्तम पावडे यांनी कृऊबास कार्यालयात दिन दिवसा पूर्वी मौखिक व आज बुधवार दि.२३ ऑगस्ट रोजी अर्ज करून माहिती मागवली आहे. परंतु ती माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने बाजार समितीची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप माहिती मागणाऱ्या तिन्ही विद्यमान संचालकांचा असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 शासकीय स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात विक्री करिता नेला जात असताना शेगाव (बु) पोलिसांनी सापळा रचून पकडला. याप्रकरणी अन्न व  पुरवठा विभाग अधिकारी यांच्या मदतीने पोलिसांनी ६ लाख वीस हजार रुपयांचा ३१ टन तांदूळ आणि २५ लाख रुपयांचा ट्रक असा ३१ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करून तालुक्यातील माढेळी येथील मुख्य सूत्रधार व व्यापारी राहुल वामनराव देवतळे, ट्रक मालक रामजीत साहू (छत्तीसगड) आणि ट्रक चालक माणिकराव रामाजी कोचे या तीन आरोपींविरुद्ध १८ऑगस्ट रोजी जीवनावश्यक वस्तू अधिनियम ३ व ७ या इसी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
 या प्रकरणात  आरोपी असलेले व्यापारी राहुल वामनराव देवतळे यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेला शेतमाल खरेदी करण्याचा परवाना आहे.
या परवान्याचा गैरवापर करीत त्यांनी तांदूळ खरेदी  दाखवली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याचे कडून याबाबतचा शेस वसूल केला. राहुल देवतळे याने तांदूळ ठेवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माढेळी येथील मार्केट यार्ड मध्ये गोदाम घेतले होते. त्या गोदामातच तो शासकीय योजनेतील तांदूळ ठेवायचा. हा तांदूळ छोट्या व्यापाऱ्यांकडून कमी दराने घेतला जात असे. हाच तांदूळ एखाद्या मिल मध्ये नेऊन चांगल्या प्रतीचा तांदूळ करण्यासाठी वापरत असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. हा गोरख धंदा गेल्या काही वर्षांपासून माढेळी परिसरात खुलेआम सुरू होता अशी चर्चा आहे.

 परंतु शेगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे या व्यापाऱ्याचा बुरखा फाटला आहे . दरम्यान माढेळी परिसरातच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यात पकडल्या गेलेल्या तांदळाचे उत्पादन होत नाही. तसेच माढळी परिसरात तांदळाची खरेदी इतर कोणताही मोठा व्यापारी करीत नाही. तेव्हा राहुल देवतळे यानेच तो तांदूळ कसा काय खरेदी केला असा प्रश्न आहे. दरम्यान या प्रकरणात राहुल देवतळे ला वाचविन्यासाठी तांदळाचा शेस फाडला गेला असावा असा आरोप आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसा विद्यमान संचालक राजेंद्र चिकटे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख आणि विद्यमान संचालक नितीन मत्ते आणि विद्यमान संचालक पुरुषोत्तम पावडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे दोन दिवसांपूर्वी आवश्यक ती  माहिती तोंडी स्वरुपात मागितली होती. संचालक असल्याने आम्हाला ती माहिती मिळावी अशी त्यांची मागणी होती. परंतु अधिकाऱ्यांनी ती माहिती दिली नाही. 

यामुळे आज बुधवार दि.२३ ऑगस्ट रोजी तिन्ही संचालकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे रितसर अर्ज करून वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या मुख्य बाजार वरोरा, उपबाजार माढेळी, शेगाव(बु), खांबाडा या ठिकाणी कोणकोणते व्यापारी शेतमालात तांदळाची खरेदी करतात, त्या सर्व व्यापाऱ्याचे नाव आणि त्या व्यापाऱ्यांनी तांदूळ खरेदी केल्याची महिना निहाय विस्तृत माहिती दिली जावी. तसेच संबंधित तांदूळ खरेदी संदर्भात बाजार समिती लिलाव पट्टी व काटापट्टी पूर्ण पुरविण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतु ही माहिती त्यांना आज बुधवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली नाही. यामुळे माढेळी येथील केंद्रप्रमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराचे सचिव यांचा या प्रकरणात सहभाग तर नाही ना अशी शंका तिन्ही संचालकांनी व्यक्त केली आहे.


शेगावचे ठाणेदार कृउबा समिती कार्यालयात

शासकीय तांदूळ तस्करी प्रकरणाच्या चौकशीसाठी शेगावचे ठाणेदार अविनाश मेश्राम हे आज बुधवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथील कार्यालयात आले होते. मात्र तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती व कागदपत्र देण्याऐवजी तीन तास ताटकळत ठेवले. या तपासात वरिष्ठांचे सुद्धा बरेच फोन येत असल्याची चर्चा आहे. यानंतर या प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी करून काही कागदपत्र हस्तगत केल्याचे सांगितले जाते.

जाहिरात 


चालकाला जामीन तर मालकाला अटक 

तांदूळ तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाच्या चालकाला २३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी आज बुधवार रोजी त्याला वरोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. दरम्यान या प्रकरणात फरार असलेला ट्रक मालक वरोरा येथे आला होता. तो चालकाला जामीन मिळवण्यासाठी तसेच त्याला सोबत घेऊन जाण्यासाठी आला असावा असा अंदाज आहे. परंतु पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी राहुल देवतळे अजूनही फरार आहे.

Comments