*आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी*
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. दुसरीकडे नवीन अनेक तरुण शिक्षण पदवी व पदविका प्राप्त होऊन नोकरीच्या शोधात आहेत अशा तरुणांना देखील नोकरी सामावून घेण्याची मागणी भद्रावती - वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. त्यासाठी शासनाने 7 जुलै 2023 रोजी काढलेल्या जीआर मध्ये सुधारना करावी अशी लोकहितकरी मागणी देखील त्यांनी केली आहे.
राज्यातील सर्व शाळा ह्या जून महिन्यात सुरु झालेल्या असून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, नियोजित शिक्षक भरती संदर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रीयेस विलंब होत आहे. पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रकिया झाल्यास शिक्षण पदवी व पदविका प्राप्त उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. शिक्षक भरती होत नसल्याने शिक्षित तरुण बेरोजगार आहे. त्यामुळे शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय सुधारित करून शिक्षण पदवी व पदविका प्राप्त उत्तीर्ण तरुणांना देखील नोकरीत घेण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment