पत्रकार सृष्टीचा गाडा हाकतो त्याला सर्वांगाने ताकद देऊ**व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची ग्वाही* *आनंदवनात रंगला कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा*

*पत्रकार सृष्टीचा गाडा हाकतो त्याला सर्वांगाने ताकद देऊ*

*व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची ग्वाही*

 *आनंदवनात रंगला कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा*
वरोरा : पत्रकार हा सृष्टीचा गाडा हाकतो. पण, तो स्वतःच्या आरोग्यापासून तर मुलांचे शिक्षण व कुटुंबाच्या हितासाठी कधी फारसा विचार करू शकत नाही. त्यांच्या समस्या अत्यंत गंभीर आहेत. तुटपुंज्या वेतनातही त्याने बजावलेल्या कर्तव्यातून समाज बदलतो. मात्र तो उपेक्षित राहतो. त्यामुळे पत्रकार बांधव सर्वांगाने उभा राहिला पाहिजे, यासाठी व्हॉईस ऑफ मीडिमार्फत ताकद देऊ, अशी ग्वाही राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे यांनी दिली. कर्मवीर स्व. बाबा आमटे स्थापित वरोरा येथील आनंदवनात रविवारी दि. २ एप्रिल २०२३ रोजी अत्यंत उत्साहात पार पडलेल्या कौटुंबिक स्नेहमिलन व विमा कवच प्रदान सभारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
आनंदवनातील महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी या सोहळ्याचे उद्घाटन केले. मंचावर व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले, विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, व्हॉईस ऑफ मीडियाचे नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सदाशिव ताजणे, डॉ. विजय पोळ, ज्येष्ठ पत्रकार माधव कवीश्वर, अरूण जैन, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे म्हणाले, १९९७-९८ पासून माझा आनंदवनशी संबंध आहे. या सेवाभूमीतील अनेक आठवणी प्रेरक आहेत. माझ्या ग्रंथामध्ये आनंदवनातील या आठवणींना शब्दबद्धही केले. जे व्यक्ती तळागाळातील माणसांसाठी कार्य करतात. तेच आमचे दैवत आहेत. ही प्रेरणा खरे तर आनंदवनापासून मिळाली. पीडित व गरजूंच्या मदतीसाठी काम करण्यासारखा दुसरा आनंद नसतो. आजच्या जागतिकीकरणात पत्रकारांच्या समस्या अधिकाधिक गंभीर होत आहेत. पत्रकार प्रचंड परिश्रम करतो. पण, त्या तुलनेत त्याला आर्थिक मोबदला मिळत नाही, अशी खंत व्यक्त करून एका पत्रकार मित्राने पैसे उसने मागितल्याची एक अस्वस्थ आठवणही त्यांनी भाषणात कथन केली. अशा संकटात सापडलेल्या पत्रकारांना आपण काय मदत करू शकतो, याचे उत्तर सापडल्यानंतर व्हाईस ऑफ मीडियाचा जन्म झाला. ही संघटना काय आहे, त्याची भूमिका काय, ती कशासाठी आणि कुणासाठी कार्य करते, हेच सांगण्यासाठी मी आज कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्यात उपस्थित झाल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे यांनी पत्रकार बांधवांच्या कुटुंबांना मोठ्या कळकळीने सांगितले. पत्रकारांच्या कर्तृत्वात कुटुंबातील स्त्रीशक्तीचा सिंहाचा वाटा असतो. त्यांनाही संघटनेच्या कार्याचे स्वरूप कळावे, यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या विद्यमान व भविष्यातील कल्याणकारी विविध उपक्रमांची माहितीही राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे यांनी यावेळी दिली. नागपूरचे जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर यांनी संघटनेशी का जुळलो, याची माहिती देऊन जिथे नेतृत्व स्ट्राँग तिथे काम करण्यात आनंद असते, अशी  अनुभवनिष्ठ भूमिका मांडली. सुधाकर कडू यांनी आनंदवनचे सचिव व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा संदेश कथन केला. 'येथे बघण्यासारखे काही नाही पण विचार करण्यासारखे बरेच काही' असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, अनिल पाटील, चैतन्य लुथडे यांचा सपत्नीक आणि सर्व तालुकाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय पडोळे तर राखी काळबांधे यांनी संचालन केले. तालुकाध्यक्ष चैतन्य लुतडे यांनी आभार मानले. सोहळा यशस्वीतेसाठी अनिल पाटील, श्याम ठेंगळी, यशवंत घुमे, गुरू गुरनुले, जितेंद्र चोरडीया, सारथी ठाकुर, सुनिल बिपटे, संदीप नागोसे, निलेश पुन्नावार, राजेश ताजणे आदींनी परीश्रम घेतले
*टीका करण्यापेक्षा आपली रेष मोठी करू- विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटिक*

विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या उपक्रमांचे वेगळेपण अधोरेखित करून पुढे म्हणाले, कुणा पत्रकार संघटनांवर आरोप करणे निरर्थक आहे. त्यामुळे आपण अधिक जोमाने कार्य करून स्वतःचीच रेष मोठी करत राहू. यापुढे विविध उपक्रम राबविण्यात विदर्भ कदापि मागे राहणार नाही, या शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

*२१ राज्यांमध्ये काम सुरू - राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले*

पत्रकार सर्वांचे प्रश्न मांडतो. पण, त्यांच्याच समस्या शिल्लक राहतात. असे घडू नये म्हणून व्हाईस ऑफ मीडियाने पत्रकारांच्या हिताचे पाऊल उचलले. आता २१ राज्यांमध्ये काम सुरू झाले. पंचसूत्री हे संघटनेचे अधिष्ठान असून त्यात सकारात्मक पत्रकारितेचे मूल्य रूजविण्याचे काम केले जात आहे. महिलांचे पाठबळ असेल तर व्हॉईस ऑफ मीडियाचे काम पुन्हा पुढे जाईल, असा आशावाद राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले यांनी व्यक्त केला.

*२६ विंगमधून चळवळीचा विस्तार- प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के*
व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे यांच्या संपर्कात आलो नसतो तर आयुष्य वाया गेले असते. या व्यक्तीमध्ये प्रचंड ऊर्जा आणि पत्रकारांचे दुःख समजून घेण्याची तळमळ आहे. त्यामुळे अनेक उपक्रम सुरू झाले. सध्या २६ विंगमधून पत्रकारांसाठी कार्य केले जात आहे. ही संघटना नव्हे; तर एक चळवळ झाली. सुरूवातीचे उपक्रम 'बुलढाणा पॅटर्न' म्हणून ओळखले जात होते. आता चंद्रपूर जिल्ह्यातही उत्तम काम सुरू झाल्याने 'चंद्रपूर पॅटर्न' म्हणून ते पुढे आले, या शब्दात ग्रामीण प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी मुक्त कंठाने कौतुक केले.


*सुमधुर स्वरानंदनवनने उपस्थितांना रिझविले*
आनंदवनातील 'स्वरानंदवन' या दिव्यांग कलावंतांच्या आर्केस्ट्राने सुमधूर गाणी सादर करून पत्रकारांची मने रिझविली. केवळ मनोरंजन नव्हे; तर कर्मयोगी बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देण्यासोबतच माणुसकीची उंची वाढविणारी आणि सकलांच्या उन्नतीला बळ देणारी आशयसंपन्न गाणी सादर केली.

*पत्रकारांना विमाकवच प्रदान*
कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्यात प्रातिनिधीक स्वरूपात तीन पत्रकारांना १० लाखांचा विमाकवच प्रदान करण्यात आला. यासाठी जिल्हाभरातील पत्रकारांनी नोंदणी केली आहे. ही नोंदणी प्रक्रिया यापुढेही सुरू राहिल, असे आवाहन करण्यात आले.

 *तेलंगणातील पत्रकारांचीही हजेरी*

व्हॉईस ऑफ मीडियाची सोशल मीडियातून माहिती मिळताच तेलंगणातील सजग पत्रकार बांधव रविवारी उत्स्फूर्तपणे आनंदवनात दाखल झाले. राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे यांनी सर्वांचा सत्कार केल्यानंतर प्रदीर्घ चर्चा केली. हे पत्रकार बांधव येत्या काही महिन्यांत व्हाईस ऑफ मीडियाचे कार्य तेलंगणातही सुरू करणार आहेत.

*विविध स्पर्धांनी बालकांचा आनंद द्विगुणीत*
महिला व बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. आनंदवनातील प्रेरणादायी आठवणी घेऊन स्नेहभोजना नंतर प्रसन्न मनाने स्पर्धेसोबतच स्नेहमिलन सोहळ्याची सांगता झाली.

Comments