*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रवींद्र शिंदे यांचे नेतृत्वातून वरोरा वासीयांतर्फे सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षाताई खेमराज कुरेकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची एकोणा कोळसा खाणीला नोटीस; तीन आठवड्यात मागितले उत्तर*
वरोरा :
वरोरा तालुक्यातील वेकोलीच्या एकोणा कोळसा खाणीतून वरोरा-माढेळी रोड मार्गे वणीपर्यंत शहरातून सुरू असलेली कोळशाची वाहतूक त्वरित थांबवून वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता बनविण्याच्या मागणीला घेवून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रवींद्र शिंदे यांचे नेतृत्वातून वरोरा वासीयांतर्फे येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षाताई खेमराज कुरेकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एकोणा कोळसा खाण कंपनी प्रशासनाला नोटीस बजावला आहे व सदर याचिकेतील मागणीनुसार कंपनीला तीन आठवड्याच्या आत उत्तर मागितले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. राजेशसिंह गहलोत हे बाजु मांडत आहेत.
यापूर्वी वारंवार मागणी करूनही वेकोली व स्थानिक तालुका प्रशासनाने या समस्येची दखल न घेतल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या समस्येविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे, हे विशेष.
दरम्यान, सदर विषयाला घेवून सोईट वरोरा व वणी वरोरा बायपाससाठी जमीन हस्तांतरणास मान्यतेचे वृत्त आले होते. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ८.७७ हेक्टर आर. जमिनीपैकी ५.७५ हेक्टर आर जमीन एरिया जनरल मॅनेजर माजरी यांना हस्तांतरीत करण्याचा शासन स्तरावर प्रस्ताव महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई पत्र क्र. संकिर्ण २०२२/ प्र. क. ५६ / अ. १ दिनांक २० फेब्रुवारी २०२३ अन्वये मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सदर प्रस्ताव तांत्रिकरीत्या चुकीचा आहे. कारण सदर जमीन ही भद्रावती तालुक्यातील नीप्पोन डेंड्रो प्रकल्पाकरिता जलसिंचन करीता अवार्ड करून घेतल्या गेलेली आहे. सदर जमीन ही शेतकऱ्यांना आधी परत करून नंतरच तिचे हस्तांतरण होवू शकते. त्यामुळे सदर प्रस्ताव हा संशयीत व दिशाभूल करणारा आहे.
वरोरा तालुक्यातील वेकोलीची एकोना खुली कोळसा खाण ही ३.४४ दशलक्ष टन प्रति वार्षिक खाण आहे. खाण क्षेत्र हे वर्धा व्हॅली कोलफिल्डच्या पश्चिम मर्यादेच्या उत्तरेकडील विस्तार आहे आणि ते एकोना गावाला लागून आहे. सदर खाण ही २०२० मधे कार्यान्वित झाली. आणि ती कार्यान्वित झाल्यापासून एकोना I आणि II खुल्या खाणीतून वणी मार्गे कोळशाच्या वाहतुकीसाठी जड वाहनांची सतत आवक आणि प्रवाह चालू आहे. वरोरा-माढेळी रोड व वरोरा-माढेळी रोडवर येणारी गावे यवतमाळ जिल्ह्यातील वणीकडे कोळसा वाहून नेणाऱ्या जड ओव्हरलोड वाहनांच्या प्रचंड आवकमुळे विविध समस्यांनी त्रस्त आहेत. कोळशाच्या वाहतुकीमुळे होणारी सततची धूळ व ध्वनी प्रदूषण परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी झाली आहे. कंपनीच्या जड वाहतुकीने रस्त्यांची दुर्दशा झाली असून अपघाताचे प्रमाण वाढू शकते. मात्र तालुका नगरप्रशासन, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाद्वारे कंपनीला एव्हढे सर्व आदेश मिळूनही कंपनी या समस्येवर कोणतेच समाधानकारक पाऊल उचलून कायमस्वरूपी तोडगा काढत नाही आहे व वेकोली योग्य उपाययोजना करण्यात अयशस्वी ठरली. म्हणून कंपनीच्या या मुजोर धोरणाविरोधात कंटाळून शेवटी शहरवासी, ग्रामस्थ व प्रभावित नागरिक यांनी रवींद्र शिंदे यांचेकडे याबाबत तक्रार केली असता, या समस्येचा रीतसर अभ्यास करून वकील तथा जाणकारांचे मत घेवून रवींद्र शिंदे यांनी शहरवासींच्या प्रतिनिधी स्वरुपात सौ. वर्षाताई खेमराज कुरेकर यांच्या नावे उच्च न्यायालयाच्या खंडपिठात याचिका दाखल केली आहे.
--------------------------------------
सदर याचिका ही शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा पक्ष श्रेष्ठींना ज्ञात करून व त्यांचे आदेशाने जनहितार्थ टाकण्यात आलेली आहे. तथा सन्मा. उध्दवसाहेब ठाकरे यांनी या कार्याची दखल घेवून अभिनंदन केले आहे. वरोरा वासीयांकरीता शेवटपर्यंत आम्ही लढा देवू. स्व. मोरेश्वरराव टेमुर्डे यांचे सदर याचिका टाकतांना मार्गदर्शन होते. आज ते नाहीत मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही त्यांच्या पश्चात करत राहू.
Comments
Post a Comment