भद्रावती येथील तरुणीची विदेशी पायलटणे केली तब्बल साडेअकरा लाखांची फसवणूक गुन्हा दाखल
भद्रावती : शहरातील पंचशील वॉर्ड येथील तरूणीची इन्स्टाग्राम या सोशल साईटवर विदेशातील तरूणाशी ओळख झाली. त्याने तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिला लग्नाचे आमिष दाखविले. मात्र कथीत ईटली येथील पायलट असलेल्या तरूणाने भद्रावती येथील तरूणीची तब्बल साडेअकरा लाखांनी फसवणूक केली. मागील आठवड्यात भद्रावती पोलिसात तक्रार केल्यानंतर घटना उघडकीस आली. या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली असून पिडीत तरूणीला न्याय देण्याचे आव्हान भद्रावती पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
पिडीत तरूणी ही आपल्या आई व दोन भावांसोबत शहरातील पंचशील वॉर्ड येथे राहते. आईला पेन्शन मिळते तसेच वडील हयात नसल्यामुळे तरुणी व भावाला काम करावे लागते. भद्रावती शहरातील २५ वर्षीय तरूणीची इंस्टाग्राम या सोशल साइटवर रिशान नामक मुलाशी ऑक्टोबर २०२२ दरम्यान ओळख झाली. नियमित चॅटिंग होत असल्याने दोघांची चांगली मैत्री झाली. त्याला वडील नसून तो एकटाच आहे व इटली या देशात पायलट असल्याचे त्याने सांगितले. तसेच भद्रावती येथील तरुणीशी लग्न करायचे असल्याचे त्याने सांगितले. नंतर काही दिवसांनी भद्रावती येथील तरुणीसाठी इटली येथून एक पार्सल पाठविले असल्याचे त्याने सांगितले. या पार्सल मध्ये २ आयफोन, ७ मनगटी घड्याळे, ९ सोन्याचे दागिने, ८ कॉस्मेटिक, ३ बॅग तसेच १ लाख ५ हजार डॉलर ज्याची भारतीय रुपयात किंमत ८६ लाख ८८ हजार ४८२ रूपये असल्याचे त्याने सांगितले.
साधारण २ नोव्हेंबर २०२२ ला दिल्ली येथील विमानतळावरून तरूणीला फोन आला. यामध्ये कस्टम क्लियरन्स चार्जेस च्या नावाखाली ३७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे भरले नाही तर भद्रावती येथील तरुणीवर तसेच पाठवणाऱ्या वर सुद्धा खटला दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने ३७ हजारांची रक्कम भरली. मात्र यानंतर तरूणीला सतत वेगवेगळी कारणे सांगून पैशांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तरूणीने एकेक करत ९८ हजार, २ लाख, १.५ लाख, ९० हजार, १० हजार, ५० हजार, २ लाख, ३ लाख असे करत एकुण ११ लाख ३५ हजार रूपये भरले. मात्र सतत पैशांची मागणी होत असल्याने संशय येऊन पीडित तरुणीने आईसह भद्रावती पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली. याआधारे भद्रावती पोलिसांनी तक्रार दाखल करत तपासाला सुरूवात केली आहे.
----------
अशा घटनांबद्दल पोलिस विभागातर्फे नागरिकांना सतत जागरूक करण्यात येते. मात्र तरीही मुलीने आंधळ्या प्रेमापोटी व लालसेपोटी ही रक्कम गमावली आहे. अशी कोणतीही घटना घडत असल्यास पोलिसांशी संपर्क साधा. आम्ही नागरिकांंच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असल्याचे मत पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment