भद्रावती : शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी ज्ञानोपासणे सोबतच क्रीडाविषयक संस्कार चांगल्या प्रकारे ग्रहण केले तर क्रीडा क्षेत्रात नामांकित होता येते, नाव कमविता येते आणि आयुष्यात करिअर म्हणून खेळांचा उपयोग करता येतो. म्हणून विद्यार्थ्यांनी शिकत असताना आपल्या अंगी खेळविषयक नैपुण्य निर्माण करावे. त्यासाठी क्रीडा मैदानात खेळांचा सराव नियमितपणे करावा असे विचार भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी व्यक्त केले. ते ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ भद्रावती द्वारा संचलित प्रियदर्शिनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष धनराज गुंडावार होते. प्रमुख पाहुणे म्हणून भद्रावतीची ठाणेदार बिपीन इंगळे, व्हाईस ऑफ मीडिया चे जिल्हा कार्याध्यक्ष तथा सह्याद्रीचा राखणदार चे वरिष्ठ संपादक डॉ. यशवंत घुमे, माजी उपनगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, धर्मेंद्र हवेलीकर, विवेक सुरावार, रवी पवार, ओंकार गुंडावर, प्राचार्य प्रवीण बाळसराफ मंचावर उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शन करताना ठाणेदार इंगळे यांनी सांगितले की, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मी खेळात सहभागी व्हायचो. खेळांमुळे आयुष्यातील विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होता येते. सांघिकतेतून व्यक्तिगत विकासही करता येतो. त्यामुळे क्रीडा महोत्सवाचे आयोजन ही काळाची गरज आहे.त त्यातून खेळांची आवड निर्माण होत असते. आपण या संधीचे सोने करावे असे विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन मेघा डोये, प्रास्ताविक प्राचार्य प्रवीण बाळसराफ, आभार धनंजय काकडे यांनी व्यक्त केले. यावेळी भद्रावती शहरातील विविध शाळांतील क्रीडा चमू प्रामुख्याने उपस्थित होते.
Comments
Post a Comment