विवेकानंद महाविद्यालयात झाला गुणवंतांचा गौरव. रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला गुणवंतांचा सत्कार

विवेकानंद महाविद्यालयात झाला गुणवंतांचा  गौरव 

रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला गुणवंतांचा सत्कार

भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात नुकताच वार्षिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.  वर्षभर चाललेल्या विविध  स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, सचिव माधव कवरासे, विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट वरोरा चे सदस्य रमेश राजुरकर, प्रसिद्ध साहित्यिक सेवानिवृत्त प्राचार्य शाम मोहरकर, प्रा. धनराज आस्वले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.  सांस्कृतिक विभागातर्फे निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा,  समूहनृत्य, एकलनृत्य, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा विभागातर्फे महाविद्यालयीन मुलामुलींकरीता  व्हॉलीबॉल स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, १०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, बुद्धिबळ इत्यादी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या सर्वच विषयातील सर्वोत्कृष्ट गुण प्राप्त विद्यार्थ्यास रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम देणाऱ्यांमध्ये महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघ,  योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक - मित्र मंडळ, प्रा. धनराज आस्वले, गुलाब पाकमोडे, विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा, विठ्ठल मांडवकर, माधव कवरासे, पुरुषोत्तम मत्ते, रजनीताई हजारे, भाऊराव कुटेमाटे इत्यादी पुरस्कारदात्यांतर्फे रोख रक्कम दिल्या. या कार्यक्रमात आदर्श विद्यार्थी आणि आदर्श विद्यार्थिनी यांची निवड करण्यात आली.
महाविद्यालयाच्या प्राध्यापकांतर्फेही प्रत्येक विषयात सर्वोच्च गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. आठवडाभर चाललेल्या या विविध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात व डॉ.बंडू जांभूळकर यांच्या समन्वयातून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments