स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून कोणत्याही कार्याप्रति सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अपेक्षित ध्येय गाठणे शक्य -आमदार प्रतिभा धानोरकर

स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून कोणत्याही कार्याप्रति सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अपेक्षित ध्येय गाठणे शक्य -आमदार प्रतिभा धानोरकर
  वरोरा : स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून कोणत्याही कार्याप्रति सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे.तसे केल्यास अपेक्षित ध्येय गाठणे कठीण नाही असे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. त्या वरोरा येथील विदर्भ पत्रकार विकास समिती तर्फे आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील३७७२ विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान परीक्षा घेणे सोपे नाही. ते या पत्रकार संघटनेनी करून दाखवले हे कौतुकास्पद आहे.अशा परीक्षामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते आणि त्यांचा हुरूप वाढतो असे सांगून पुढे अशा परीक्षांसाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. रविवार दि. ११ डिसेंबर रोजी स्थानिक नगर भवन मध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतिभा धानोरकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ. सागर वझे,बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मिलिंद देशपांडे, डॉ. विवेक तेला,डॉ.राहुल धांडे, एक्सलेंट अकॅडमीचे प्रा. अभय टोंगे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य पोद्दार व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा.अभय टोंगे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या बोद्धीक विकासाला बालवयाच सुरुवात झाली पाहिजे. सध्याचे युग स्पर्धेचे आहे.यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी ज्ञानाचा अथांग सागर व स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे. परिस्थिती कोणाच्याही प्रगतीच्या आड येऊ शकत नाही. यामुळे परिस्थितीवर मात करून पुढे जायला शिका असे प्रा.टोंगे यावेळी म्हणाले. सर्वच प्रमुख पाहुण्यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. यानंतर सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम आलेल्या प्रज्वल चिडे यांना डॉक्टर सागर वझे यांच्याकडून पाच हजार रुपये रोख व डॉ. संतोष मुळेवार यांच्याकडून स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या रितेश मुसळे याला तीन हजार रुपये रोख डॉक्टर संतोष मुळेवार यांच्याकडून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकावर राहिलेल्या पायनिखा काळपांडे हिला दोन हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तसेच चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या अयेमन अकबर शेख याला हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. ब गटातून प्रथम आलेल्या विद्याधर घनश्याम पाटील त्याला पाच हजार रुपये रोख डॉक्टर संतोष मुळेवार यांच्याकडून स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या योगिता येंचलवार यांना तीन हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तीसरा आलेल्या आशिष शेळके याला दोन हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या रोशन पांढरे याला हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. दोन्ही गटातील सहा-सहा विजेत्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आली. सर्व प्रमुख पाच-पाच विजेत्यांना तलाठी विनोद खोब्रागडे यांच्याकडून संविधानाचे पुस्तक आणि सामाजिक कार्यकर्ते जुबेर कुरेशी यांच्याकडून उडान हे पुस्तक भेट स्वरूप देण्यात आले. आनंदवन मूकबधिर विद्यालयातून प्रथम आलेल्या अमन गायकवाड,द्वितीय आलेल्या अनिशा भोसकर आणि अमोल पवार यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यासोबतच थोरवी चैतन्य लुतडे हीचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सहभागी विद्यार्थ्यांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांचाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विनोद खोब्रागडे यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले. सदर परीक्षेत ५० पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विदर्भ पत्रकार विकास समितीच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार विकास समितीचे अध्यक्ष चैतन्य लुतडे यांनी केले. राजेंद्र मर्दाने यांनी संचालन तर डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले. पत्रकार समितीच्या शाहिद अखतर, प्रवीण गंधारे,अनिल पाटील, सारथी ठाकूर,हरीश केशवानी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सहकार्य केले.

Comments