विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत चोरी

विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत चोरी
चंद्रपूर  - भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बँकेची खिडकी तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून एकूण २१ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची गावात चर्चा आहे. आज १८ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांना बैंकेची खिडकी तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
चंदनखेडा येथे विदर्भ कोंकण ग्रामीण बैंक ही मुख्य मार्गावरच आहे. दरम्यान रात्रीच्या सुमारास काही अज्ञात आरोपींनी बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी तोडून आत प्रवेश केला. यावेळी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवून असलेले सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम असा एकूण जवळपास २१ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून पळ काढला. ग्रामस्थांना सकाळच्या वेळी बैंकेचे खिडकी तुटून दिसल्याने त्यांचा संशय बळावला व त्यांची या घटनेची माहिती तातडीने बैंकेचे व्यवस्थापक सद्दाम फुलझेले यांना दिली. यानंतर भद्रावती पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी पोलिस पथकासह श्वान पथक घेवून घटनास्थळाची पाहणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळी तपास करीत होते. परंतु, सायंकाळी वृत्तलिहेपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहे. चंदनखेडा गावातील कुठल्याही बैंकेसमोर रात्री एकही सिक्युरिटी गार्ड राहत नाही. इतक्या मोठ्या गावात बैंकेसमोर रात्री सिक्युरिटी गार्ड असणे गरजेचे आहे, अशी चर्चा गावातील लोकांमध्ये सुरू आहे.

Comments