भद्रावती : तालुक्यातील चपराडा येथील प्रतिष्ठित नागरिक गोपाल बोंडे यांच्या शेतात भीतीने दडून बसलेले निलगायीचे पिल्लू सोमवारी सायंकाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
रविवारी सायंकाळी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी निलगायीचे भेदरलेले पिल्लू गोपाल बोंडे यांच्या शेतात येवून बसले असावे. सोमवारी दुपारपर्यंत चपराडा येथे रिपरिप पाऊस सुरू होता. यावेळी गोपाल बोंडे हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना निलगायीचे हे पिल्लू शेतात भितीने दडी मारून बसलेले दिसले. लगेच याची सुचना वनविभागाला देण्यात आली. निलगायीच्या पिल्लाला बघण्यासाठी गावकऱ्यांची तोबा गर्दी जमली. काही वेळातच निलगायीच्या पिल्लाला भद्रावतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे यांना सुपूर्त करण्यात आले.
चपराडा येथील गोपाल बोंडे हे शेतकरी संरक्षण समिती तालुका भद्रावतीचे अध्यक्ष तसेच भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास (अन्ना हजारे प्रणित) तालुका शाखा भद्रावतीचे अध्यक्ष आहेत. यावेळी चपराडा येथील विलास आगलावे, कुणाल नागपुरे, रमेश आगलावे, सुरेश पोतराजे, मनोज आवारी, वामन पोतराजे तसेच गावातील नागरिकांनी सहकार्य केले.
यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास (अण्णा हजारे प्रणित) जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तथा
शेतकरी संरक्षण समिती जिल्हा चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल बदखल प्रामुख्याने उपस्थित होते. निलगायीचे पिल्लू वनविभागाच्या स्वाधीन करून भुतदयेचे उदाहरण दाखविल्यामुळे गोपाल बोंडे यांचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment